हॅप्पी बर्थडे भुवी !

आज भारतीय संघाचा स्टार ऑल राऊंडर भुवनेश्वर कुमारचा आज २८वा वाढदिवस. भुवनेश्वर कुमारचा जन्म ५ फेब्रुवारी १९९०मध्ये उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे झाला आहे.

आज या खेळाडूला अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेत असून वनडेत मालिकेत चांगली कामगिरी करत आहे.

भुवनेश्वरने भारताकडून २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्ध टी२० सामन्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर केवळ ५ दिवसांनी तो आपला पहिला वनडे सामनाही पाकिस्तानविरुद्ध चेन्नई येथे खेळला, त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला २ महिन्यांनी कसोटी संघात स्थान देण्यात आले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई कसोटीत २२ फेब्रुवारी रोजी या खेळाडूने कसोटी पदार्पण केले.

पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि हरभजन सिंगसारख्या दिग्गजांबरोबर खेळायला मिळाले तर वनडे पदार्पणात गंभीर, सेहवाग, युवी आणि धोनीसारखे दिग्गज संघात होते.

भुवीने भारताकडून जेव्हा पदार्पण केले तेव्हा तिन्ही प्रकारच्या संघाचे नेतृत्व भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी करत होता हे विशेष.

कसोटी पदार्पणात त्याने तब्बल ९७ चेंडूचा सामना करताना तब्बल १६७ मिनिट खेळपट्टीवर ठाण मांडले होते. तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देशांतगर्त क्रिकेटमध्ये ० धावेवर बाद करणारा पहिला खेळाडू ठरला होता.

२०१६ आणि २०१७मध्ये आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप सलग दोन वर्ष मिळवणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला होता. अशा या खेळाडूस २८ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.