हॅपी बर्थडे युवी… !

भारताचा फायटर क्रिकेटपटू युवराज सिंग आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. युवराज हा मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचा १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातून सुरु झालेला प्रवास कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर पडून पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करत अजूनही सुरु आहे. या लढवय्या क्रिकेटपटूंच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या प्रवासाचा घेतलेला आढावा.

१९ वर्षांखालील विश्वचषक: २००० साली श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघात युवराजने महत्वाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेचा मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

या विश्वचषकात भारताचा अंतिम सामना श्रीलंका संघाशी २८ जानेवारीला झाला होता. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. युवराजने या विश्वचषकात १०३ च्या स्ट्राईक रेटने ८ सामन्यात २०३ धावा केल्या होत्या, तसेच १२ बळी घेतले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०००: मोठ्या स्पर्धेचा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवीचे भारतीय वरिष्ठ संघात पदार्पणही चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेतून झाले.

पदार्पणाच्याच या स्पर्धेत खेळताना त्याने ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाविरुद्ध खेळताना ८० चेंडूत ८४ धावा केल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात मॅकग्राथ, ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी यांसारखे दिग्गज गोलंदाज होते. यांच्या विरुद्ध खेळताना त्याने ही आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

या स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळताना ४ विकेट्सने पराभव स्वीकारला होता.

२००३ विश्वचषक: या २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली होती. युवराजसाठी देखील हा विश्वचषक चांगला गेला होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५० धावा केल्या होत्या तसेच, नामिबियाविरुद्ध खेळताना ४.३ षटकातच ६ धावा देत ४ बळी मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

२००७ टी २० विश्वचषक: हा विश्वचषक भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाहीत आणि त्यात युवीने इंग्लंड विरुद्ध मारलेले ६ षटकार तर आजही सर्वांच्या लक्षात आहेत. याच विश्वचषकात त्याने दोन मोठे विक्रम केले होते.

इंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मैदानाच्या सर्व दिशांमध्ये ६ षटकार मारले होते आणि १२ चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. टी २० प्रकारात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा हा विक्रम आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामन्यात खेळताना त्याने आक्रमक फलंदाजी करताना फक्त ३० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करत पहिला टी २० विश्वचषक जिंकला होता.

२०११ विश्वचषक: भारतात झालेल्या या २०११ विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेला युवराजने या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती.

भारताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यात युवराजचा वाटा मोठा होता. याच विश्वचषकात त्याच्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची सुरुवात झाली होती. त्याने या विश्वचषकात ४ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.

या विश्वचषकात युवराजने ९०.५० च्या सरासरीने एक शतक आणि चार अर्धशतकांसह ९ सामन्यात ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ बळी घेतले होते. या त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने मालिकावीर पुरस्कारही मिळवला होता.

२०१४ टी २० विश्वचषक: कॅन्सर सारख्या आजारातून बरा होऊन पुन्हा एकदा त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसऱ्या इनिंगमध्ये २०१४ चा विश्वचषक महत्वाचा ठरला.

या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु त्यांना श्रीलंका विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला होता. या विश्वचषकात युवीने त्याचा आवडता प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६० धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

२०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी: ही चॅम्पियन्स ट्रॉफी मात्र युवराजला काही खास ठरली नाही. युवराज भारताकडून ही शेवटची मोठी स्पर्धा खेळला आहे. त्याने या स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध  ५३ धावांची खेळी केली होती. या व्यतिरिक्त त्याला जास्त काही करता आले नव्हते.

या चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध १८० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.

इंग्लड विरुद्ध वनडेत सर्वोच्च खेळी: भारतीय संघात सतत ये-जा करणाऱ्या युवराजला १९ जानेवारी २०१७ हा दिवस महत्वाचा ठरला. त्याने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत दुसऱ्या सामन्यात १५० धावांची खेळी केली. ही त्याची वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली.

२०१६ आयपीएल: युवराजला २०१६ चे आयपीएल महत्वाचे ठरले. २०१६ या वर्षीचे आयपीएलचे विजेता संघ ठरलेल्या सनरायझर्स हैद्राबाद संघात युवराजचा समावेश होता. त्यामुळे हे आयपीएल वर्ष त्याच्यासाठी खास ठरले होते.

युवराज विशेष:

कसोटी कारकीर्द:
पदार्पण-१६ ऑक्टोबर २००३ न्यूझीलंड विरुद्ध
४० सामने, १९०० धावा, ३ शतके, ११ अर्धशतके, १६९ सर्वोच्च धावा, ९ बळी

वनडे कारकीर्द:
पदार्पण- ३ ऑक्टोबर २००० केनिया विरुद्ध
३०४ सामने, ८७०१ धावा, १४ शतके, ५२ अर्धशतके, १५० सर्वोच्च धावा,१११ बळी

आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्द:
पदार्पण- १३ सप्टेंबर २००७ स्कॉटलंड विरुद्ध
५८ सामने, ११७७ धावा, ८ अर्धशतके, ७७* सर्वोच्च धावा,२८ बळी

महत्त्वाच्या बातम्या:

गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या खेळाडूचा आयपीएलला बाय बाय

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कारणही आहे तसचं काहीस वेगळं

शास्त्रींना प्रशिक्षक पदाववर नेमण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा बीसीसीआयवर मोठा आरोप