चेंडू छेडछाड प्रकरणावरील आयसीसीच्या निर्णयावर हरभजन सिंगचे खडेबोल

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना चेंडू छेडछाड प्रकरणामुळे चांगलाच गाजत आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण क्रिकेट वर्तुळात उमटले आहेत.

या प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रोफ्ट या दोन खेळाडूंवर आयसीसीने कारवाई देखील केली आहे. या कारवाईमध्ये स्मिथला 100% दंड आणि एका सामन्याची बंदी तर बॅनक्रोफ्टला सामना फीच्या 75% दंड आणि 3 डिमेरिट पॉईंट्स देण्यात आले आहे.

या प्रकरणावर सर्वच स्थरातून स्मिथ, बॅनक्रोफ्ट आणि ऑस्ट्रेलिया संघावर टीका होत आहे. त्यातच भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने आयसीसीने स्मिथला आणि बॅनक्रोफ्टला सौम्य शिक्षा दिली असल्याचे म्हणत ट्विटरवरून फटकारले आहे. तसेच त्याने आयसीसीने शिक्षा करताना भेदभाव केल्याचेही म्हटले आहे.

त्याने ट्विट करताना 2001 च्या  दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या कसोटी मालिकेची आठवण करून दिली. त्या मालिकेत हरभजन सोबत सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, सोैरव गांगूली, शिव सुंदर दास आणि दीप दासगुप्ता यांना सुद्धा विविध कारणांमुळे बंदीला सामोरे जावे लागले होते. त्याचबरोबर त्याने मंकी गेट प्रकरणाचा उल्लेख ट्विट मध्ये केला आहे.

त्याने ट्विट केले की ” आयसीसीने चांगला निष्पक्षपातीपणा केला आहे. बॅनक्रोफ्ट विरूद्ध सगळे पुरावे असताना त्याला सामना बंदी नाही आणि आम्हा सहा जणांना 2001 च्या दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या कसोटी मालिकेत सामना बंदी ते पण काहीच पुरावे नसताना. आठवते का सिडनीचा 2008 चा सामना ?  दोषी आढळलो नाही तरी 3 सामन्यांची बंदी. वेगळ्या लोकांसाठी वेगळे नियम”

याचबरोबर इंग्लडचा माजी कर्णधार मायकल वॉगन याने सुद्धा आयसीसीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की स्मिथ आणि बॅनक्रोफ्टला झालेल्या शिक्षा फारच कमी आहेत. आयसीसीने तर पूर्ण संघावर बंदी आणली पाहीजे.