ज्या लोकांना वाटते मी यावर्षात कमी क्रिकेट खेळलो त्यांना ‘सॉरी’ – हार्दिक पंड्या

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला १६ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे. हार्दिकच्या म्हणण्यानुसार त्याला विश्रांती देण्यात आली असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

सीएनएन न्युज १८ ला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक बोलत होता. तो म्हणाला ” प्रामाणिकपणे सांगायचं तर मीच ही विश्रांती मागितली होती. माझे शरीर या मालिकेसाठी तयार नाही. मी या वर्षात जे क्रिकेट खेळलोय त्यामुळे माझ्या शरीराच्या काही तक्रारी आहेत. मला क्रिकेट खेळायचे आहे जेव्हा मी पूर्ण तयार असेल आणि माझे १०० टक्के योगदान देऊ शकेल. मला ही विश्रांती मिळाल्यामुळे मी आता जिम मध्ये जाऊन माझा फिटनेस सुधारू शकतो.”

“खरं सांगायचं तर मी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी खूप उत्सुक आहे. मला मिळालेल्या या विश्रांतीचा उपयोग दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी लागणाऱ्या फिटनेससाठी करायचा आहे. मी या एका वर्षात ३० वनडे २५ टी २० आणि ३ कसोटी सामने खेळलो आहे. जर लोकांना वाटत असेल की मी कमी क्रिकेट खेळलो आहे तर मला त्यांना सांगायचे आहे की मला माफ करा. एक अष्टपैलू म्हणून हे आणखी अवघड असते. “

हार्दिक पंड्या जून महिन्यात झालेल्या चॅम्पिअनस स्पर्धेपासून भारतीय संघात सलग खेळत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत हार्दिक मालिकावीर ठरला होता.
.