हरयाणा स्टीलर्स करणार का पराभवाची परतफेड?

प्रो कबड्डीमध्ये आज पहिला सामना यु मुंबा आणि हरियाणा स्टीलर्स या दोन तोलामोलाच्या संघात आहे. या मोसमाच्या सुरुवातीला हे दोन संघ आपसात भिडले होते. त्या सामन्यात यु मुंबा संघाने एका गुणांच्या फरकाने निसटता विजय मिळवला होता.

हरियाणा संघाच्या डिफेन्सने पूर्ण मोसमात कमालीचे सातत्य दाखवले आहे. या संघाचे दोन्ही कॉर्नर मोहीत चिल्लर आणि सुरिंदर नाडा हे या मोसमात खूप चांगल्या लयीत आहेत. सुरिंदर नाडा या मोसमाच्या यशस्वी डिफेंडर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मोहित चिल्लर प्रो कबड्डी इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी डिफेंडर आहे. या संघासाठी या संघाचे रेडर्स चिंतेची बाब बनले आहेत. विकास कंडोला वगळता अन्य कोणत्याही रेडरला या मोसमात छाप पाडता आली नाही. वजीर सिंग आणि दीपक दहीया यांनी मोक्याच्या वेळी गुण मिळवले आहेत पण त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही.

रेडींग डिपार्टमेंट मधील काही चुकांमुळे या संघाने हातातले सामने बरोबरीत सोडवण्यात समाधान मानावे लागले आहे. मागील दबंग दिल्ली विरुद्धच्या सामन्यात या संघाने शेवटच्या मिनिटात रेडींगच्या जोरावर सामना जिंकला. त्यामुळे या संघाचे रेडर्स आत्मविश्वासाने या सामन्यात उतरतील. ही एक बाबी या संघाच्या दृष्टीने चांगली आहे.

यु मुंबाची स्थिती हरयाणा स्टीलर्सच्या बरोबर विरोधी आहे. या संघाला डिफेन्समधील कमजोरीचा फटका सहन करावा लागत आहे. या संघातील रेडर्स सध्या उत्तम कामगिरी करत आहेत पण डिफेन्समध्ये एखादा अनुभवी डिफेंडर नसल्याने मोक्याच्या वेळी डिफेंडर्स चुका करत आहेत. त्यामुळे हा संघ सामन्यात वर्चस्व स्थापन करून शेवटच्या काही मिनिटात सामना गमावत आहे. अनुप कुमार,काशीलिंग आडके,श्रीकांत जाधव यांनी मागील काही सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. हरियाणा आणि मुंबा यांच्यात झालेल्या मागील सामन्यात अनुप कुमारने निर्णायक कामगिरी केली होती. त्याच्याकडून आजच्या सामन्यात देखील तशीच अपेक्षा यु मुंबाचे पाठीराखे करत असणार.

हरयाणा स्टीलर्सने सहा सामन्यात तीन विजय,दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत तर फक्त एक सामना गमावला आहे. तो सामना त्यांनी यु मुंबाविरुद्धच गमावला होता. या सामन्यात हरियाणा स्टीलर्स त्या सामन्यातील पराभवाची परतफेड करतो कीं हा सामना जिंकून यु मुंबा संघ विजयी लयीत परततो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.