यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स तिसऱ्या वेळेस आमनेसामने

आज प्रो कबड्डीमध्ये १०८ वा सामना यु मुंबा आणि हरयाणा स्टीलर्स या दोन संघात होणार आहे. झोन ए मधील या सामन्याला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या हेतूने खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे. झोन ए मध्ये प्ले ऑफसाठी स्थान मिळवण्याची मोठी स्पर्धा चालू आहे. त्यातही या दोन संघात मोठा संघर्ष असून जो या सामन्यात जिंकेल त्या संघाला प्ले ऑफ मध्ये जागा बनवणे सोपे होणार आहे.

यु मुंबा संघाने या मोसमात १८ सामने खेळले आहेत. त्यातील १० सामने हा संघ जिंकला आहे तर उर्वरित ८ सामन्यात या संघाने पराभव पत्करला आहे. या संघाचे साखळी मधील शेवटचे चार सामने बाकी असून ते सामने जिंकून आपली प्ले ऑफ समध्ये स्थान मिळवण्याचे दावेदारी मजबूत करण्याचा या संघाचा प्रयन्त राहील.

यु मुंबा संघाने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली नव्हती. ही स्पर्धा मध्यावर आली त्यानंतर या संघाने लय पकडली. मागील ८ सामन्यांपैकी ७ सामन्यात मुंबा संघाने विजय मिळवाल आहे. या संघातील सर्व खेळाडू सध्या चांगल्या लयीत असून त्यांचे मनोबल ही उंचावलेले आहे. अनुप कुमार स्वतः अग्रेसर राहून सर्व आघाड्यांवरून उत्तम खेळ करून घेत आहे. मागील सामन्यात काशीलिंग अडकेच्या दुखापतीने डोके वर काढले होते आणि त्याच बरोबर शब्बीर बापू देखील पूर्ण तंदुरुस्त भासत नाही. खेळाडूची तंदुरुस्ती हाच फक्त या संघासाठी मोठा प्रश्न आहे. या संघाकडे नितीन मदने आणि श्रीकांत जाधव हे दमदार रेडर आहेत जे या दुखापतग्रस्त खेळाडूंची कमी भासू देणार नाहीत.

हरयाणा स्टीलर्स संघाचा स्पर्धेतील प्रवास देखील खूप उत्तम राहिला आहे. या संघाकडे सर्वात मजबूत डिफेन्स आहे. प्रो कबड्डीमधील हा एकमेव संघ आहे की ज्यांचे डिफेन्समधील गुण त्यांच्या रेडरने मिळवलेल्या गुणांपेक्षा कित्येकदा जास्त असतात. सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर उत्तम लयीत आहेत. संघातील रेडर्सच्या कामगिरीत सातत्याचा अभाव हे या हरयाणा संघासाठी डोकेदुखी ठरते आहे.

हरयाणा स्टीलर्सने देखील या मोसमात १८ सामने खेळले असून त्यातील ९ सामने त्यांनी जिंकले आहेत. पाच सामन्यात या संघाने पराभव स्वीकारला आहे तर ४ सामने त्यांनी बरोबरीत सोडवले आहेत.मागील पाच सामन्यतः त्यांनी दोन विजय, दोन राभव तर एक सामना बरोबरीत राखला आहे. रेडींगमध्ये वजीर सिंग, प्रशांत राय आणि दीपक दहिया या खेळाडूंकडून अपेक्षा असतील. हा सामना यु मुंबाचे रेडर्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्सचे डिफेंडर्स असा रंगण्याची जास्त चिन्हे आहेत.

दोन्ही संघाने या मोसमात १८- १८ सामने खेळले आहेत. त्यात हरयाणा स्टीलर्स ५९ गुणांसह ‘झोन ए’ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे तर यु मुंबा ५४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. हा या दोन संघातील तिसरा आणि साखळीतील अंतिम सामना आहे. त्यांतें हे दोन संघ साखळीमध्ये आपसात भिडणार नाहीत. या सामन्यात यु मुंबा संघाला विजयाची जास्त संधी असणार आहे.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –
# या दोन संघातील पहिल्या दोन्ही लढती यु मुंबा संघाने जिकल्या आहेत.

# यु मुंबा आणि पुणेरी पलटण हे दोन संघ आहेत ज्यांनी एकही सामना बरोबरीत सोडवलेला नाही.

# हरयाणा स्टीलर्सने ‘झोन ए’ मध्ये सर्वाधिक ४ सामने बरोबरीत सोडवले आहेत.