पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत हरयाणा आज भिडणार गुजरात बरोबर

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमामध्ये एक रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला होता त्या सामन्यातील संघ गुजरात फॉरचुनजायन्टस आणि हरयाणा स्टीलर्स आजच्या पहिल्या सामन्यात परत एकमेकांसमोर येणार आहेत. मागील सामन्यासारखाच हा सामना देखील प्रेक्षकांना खूप आवडेल असे वाटते आहे. दोन्ही संघानी या मोसमात चांगली कामगिरी केली आहे पण विजयाने त्यांना हुलकावणी दिली आहे.

हरयाणा संघाला यु मुंबासोबत झालेल्या पहिल्या सामन्यात एका गुणाने हार पत्करावी लागली होती तर गुजरात सोबत झालेल्या सामन्यात त्यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. गुजरातच्या संघाने पहिल्या सामन्यात दबंग दिल्ली संघाला हरवले होते तर पुढील सामन्यात त्यांना हरयाणाने बरोबरीत रोखले.

हरयाणा आणि गुजरात संघात झालेल्या मागील सामन्यात गुजरातने बढत मिळवली आणि नंतर हा सामना त्यांचा हातातून निसटत गेला. पण त्याना तो बरोबरीत सोडवण्यात यश मिळाले. सुकेश हेगडेला कर्णधाराला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने मागील दोन्ही सामन्यात मिळून फक्त ६ गुण मिळवले आहेत. तर मागील मोसमातील सर्वोत्कृष्ठ डिफेंडर ठरलेला फझल अत्राचली हरयाणा संघाविरुद्धच्या सामन्यात फक्त २ गुण मिळवू शकला होता.

हरयाणा स्टीलर्सने मागील दोन्ही सामन्यात रेडींग आणि डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी केली आहे. खासकरून या संघाचा कर्णधार असणाऱ्या सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये २ सामन्यात १२ गुण मिळवले आहेत. पण त्याला अन्य कोणत्याही खेळाडूकडून साथ लाभली नाही अन्यथा मागील दोन्ही सामन्याचे निकाल हरयाणा संघाच्या बाजूने लागले असते. वझीर सिंगने मागील सामन्यात चांगली कामगिरी केली नव्हती पण विकास कंडोलाने मागील दोन सामन्यात मिळून १३ रेडींग गुण मिळवले आहेत. वझीर आणि मोहीत चिल्लरकडून चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.

हा सामना जिंकून हरयाणा स्टीलर्स प्रो कबड्डीमधील आपला पहिला विजय मिळवण्यासाठी उत्सुक असेल तर गुजरात संघ विजयी मार्गावर परतण्यासाठी या सामन्यात उतरेल.