आज हरयाणा स्टीलर्स भिडणार जयपूर पिंक पँथर्सशी

रांची । प्रो कबड्डीमध्ये ८७ वा सामना आज हरयाणा स्टीलर्स आणि जयपूर पिंक पँथर्स या संघात होणार आहे. या दोन संघातील हा दुसरा सामना आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. मागील सामन्यात दुखापतीतून सावरून मंजीत चिल्लरने पुनरागमन केले होते. तो सामना २७-२७ असा बरोबरीत सुटला होता.

मागील काही सामन्यात हरयाणा स्टीलर्स संघाची कामगिरी सरासरीची राहिली आहे. मागील पाच सामन्यात त्यांनी तीन पराभव, एक विजय आणि एक सामना बरोबरीत सोडवण्याची कामगिरी केली आहे. मोसमाच्या सुरुवातीला सुरिंदर नाडाने डिफेन्समध्ये जे मजबूत प्रदर्शन केले होते तसे प्रदर्शन करण्यास सुरिंदर कमी पडतो आहे. जयपूर विरुद्धच्या मागील सामन्यात सुरिंदर नाडा आणि मोहित चिल्लर खेळले नव्हते त्यामुळे ते या सामन्यात खेळतील असे वाटते आहे.

या संघाला रेडींगच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. विकास कंडोला दुखापतग्रस्त झाल्यापासून या संघाच्या रेडींगमधील धार थोडी कमी झाली आहे. वजीर, दीपक दहिया, प्रशांत राय कुमार हे रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करत आहेत परंतु त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. एका सामन्यात एखादा रेडर उत्तम कामगिरी करतो बाकीचे रेडर त्या सामन्यात प्रभावशून्य कामगिरी करतात. हा मुख्य प्रश्न हरयाणा स्टीलर्सला भेडसावत आहे.

जयपूर संघाची परिस्थिती देखील हरयाणा स्टीलर्स संघाशी मिळती जुळतीच आहे. मागील पाच सामन्यात त्यांनी दोन पराभव,दोन विजय तर एक सामना बरोबरीत सोडवला आहे. या संघासाठी मंजीत चिल्लरचे पुनरागमन ही चांगली बाब ठरते आहे. रेडींगमध्ये जयपूरची भिस्त पुन्हा पवन कुमार याच्यावर असणार आहे. जयपूर विरुद्ध मागील सामन्यात नितीन रावल याने सुपर टेन कमावले होते. त्याच्याकडून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अशा असणार आहे.

या सामन्यात दोन्ही संघाला जिंकण्याची समान संधी आहे तरी सामना हरयाणा स्टीलर्सच्या बाजूने झुकण्याची चिन्हे जास्त आहेत. या सामन्यात जो संघ जिंकेल व प्ले ऑफ साठी आपली दावेदारी जास्त मजबूत करेल.