फेसबुकवर पोस्ट टाकण्याआधी हसीन जहाँने केला होता सौरव गांगुलीला संपर्क

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर विवाह बाह्य संबंधाचा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात अनेक नवीन नवीन खुलासे होऊ लागले आहेत.

हसीनने शमीवर अनैतिक संबंधाचे गंभीर आरोप करताना फेसबुकवर ७ ते ८ पोस्ट लिहील्या आहेत. तिने शमीच्या फेसबुक आणि वाॅट्सअॅप चटींगचेही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. पण हे करण्याआधी तिने बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीला संपर्क केला असल्याचे म्हटले आहे.

याबद्दल एबीपी न्युजशी बोलताना हसीनने सांगितले की, “मी फेसबुकवर या वादाबद्दल पोस्ट टाकण्याआधी सौरव गांगुलीला संपर्क केला होता. मी त्यांना, मला जो त्रास होत आहे त्याबद्दल सांगितले. आणि मी हेही सांगितले की मला शमीकडून चांगली वागणूक मिळत नाही. त्याला घटस्फोट हवा आहे. यावर सौरव सर म्हणाले, ते मला पुढच्या आठवड्यात संपर्क करतील.”

“पण आजही मी त्याच्या संपर्काची वाट पाहत आहे. त्यांनी मला तेव्हापासून अजून संपर्क केलेला नाही. मला वाटते की त्यांनी ही घरगुती बाब आहे असा विचार केला असेल.”

एका वृत्तानुसार बीसीसीआयच्या ४ अधिकाऱ्यांची टीम शमीविरोधात चौकशी करण्यासाठी कोलकातामध्ये दाखल झाले आहे. तसेच हसीनची कोलकाता पोलिसांनी या प्रकरणाबद्दल चौकशी केली होती.

याबद्दल ती म्हणाली, ” मला बीसीसीआयच्या कोणत्याही टिमविषयी माहिती नाही. मला लाल बाजार पोलीस चौकीत बोलावले होते. तिथे माझे वडीलही माझ्या बरोबर होते. पोलीस चौकीत एका टीमने माझी चौकशी केली. मला त्या टीम बरोबर बीसीसीआयचे अधिकारी होते की नाही याबद्दल कसलीही कल्पना नाही . “

त्याचबरोबर तिने असेही सांगितले की लाल बाजार पोलीस चौकी तिला पूर्णपणे सहकार्य करत आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल.

या प्रकरणामुळे बीसीसीआयने शमीबरोबरचा खेळाडूंसाठी असणारा वार्षिक करारही स्थगित केला आहे. हसीनने शमीविरोधात ९ मार्चला एफआयआर दाखल केला होता. यात तिने त्याच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचाही आरोप केला होता.

२०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मोहम्मद शमीने हसीन बरोबर २०१४ मध्ये लग्न केले होते.