आणि डेल स्टेनने क्रिकेटप्रेमींची मने जिंकली

केपटाऊन। दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गॊलंदाज डेल स्टेनला दुखापतीमुळे भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतून बाहेर जावे लागणार आहे. त्याला सध्या सुरु असलेल्या पहिल्या कसोटी दरम्यान टाचेची दुखापत झाली. पण ही दुखापत असतानाही स्टेन आज फलंदाजीसाठी मैदानात उताराला होता. यामुळे त्याने संघ हिताला दिलेले महत्व समजते.

स्टेन नोव्हेंबर २०१६ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या खांद्याच्या दुखापतीनंतर पहिल्यांदाच कसोटी सामना खेळत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना महत्वाचा आहे. परंतु त्याला सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचे १८ वे षटक टाकत असताना ही दुखापत झाली ज्यामुळे त्याला आता या मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे.

असे असतानाही स्टेनकडून आज सर्वांना एक चांगली गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात ९ बाद १३० धावा अशा अडचणीत सापडली असताना स्टेन ११ वा फलंदाज म्हणून मैदानावर फलंदाजीसाठी आला. तो जेव्हा मैदानात येत होता तेव्हा त्याला नीट चालताही येत नव्हते. असे असतानाही तो खेळायला आला याचे सर्वांनी कौतुक केले. 

विशेष म्हणजे या डावात स्टेन ४ चेंडू खेळून नाबाद राहिला आणि दुसरीकडे डावात स्थिरावलेला एबी डिव्हिलियर्स मात्र बाद झाला. ज्यामूळे दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १३० धावात संपुष्टात आला. भारताला या सामन्यात जिंकण्यासाठी २०८ धावांचे लक्ष्य आहे.

स्टेनने जून २०१५ पासून ६ कसोटी सामने खेळले आहेत आणि यात तो चार कसोटीत दुखापत ग्रस्त झाला आहे.

याच कारणामुळे सोशल मीडियावर स्टेनचे स्वागत आणि कौतुक करणारे अनेक ट्विट पाहायला मिळाले.