एकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक; कर्णधार आंद्रे रसलचा धमाका

10 आॅगस्टचा दिवस विंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसलसाठी खास ठरला आहे. कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात त्याने हॅट्रिक आणि शतकही साजरे केले आहे.

ही कामगिरी त्याने सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमीयर लीगमध्ये जमैका थलावाहसंघाकडून त्रिनबागो नाईट रायडर्स संघाविरुद्ध केली आहे.

हा सामन्यात दोन्ही संघांच्या मिळून तब्बल 400 पेक्षा जास्त धावा झाल्या. त्रिनबागोने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 223 धावा केल्या. त्यांच्याकडून कॉलिन मुन्रो(61धावा) आणि ब्रेंडन मॅक्युलमने(56 धावा) अर्धशतके केली.

तसेच ख्रिस लिन(46 धावा) आणि मुन्रोमध्ये 98 धावांची दुसऱ्या विकेटसाठी भागिदारी झाली. तर मुन्रो आणि मॅक्यूलममध्ये चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी झाली.

याचवेळेस रसलची गोलंदाजी बहरली आणि त्याने सामन्याच्या 20 व्या षटकात मॅक्यूलम, डॅरेन ब्रावो आणि दिनेश रामदिनला सलग चेंडुंवर बाद करत हॅट्रिक साजरी केली.

त्यानंतर त्रिनबागोने दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना जमैका संघाची आवस्था 5 बाद 41 धावा अशी झालेली असताना रसल सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

यानंतर मात्र रसलने आक्रमक खेळ करताना केन्नार लेविसला साथीला घेत एकहाती जमैकाला सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. त्याने 40 चेंडूतच शतक साजरे केले. तसेच सीपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचाही विक्रम रचला.

त्याने या सामन्यात 49 चेंडूत 6 चौकार आणि 13 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 121 धावा केल्या. त्याचबरोबर त्याला अर्धशतक करत लेविसने एका बाजूने भक्कम साथ दिली. लेविसने 35 चेंडूत 51 धावा केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले.

पण जमैकाला विजयासाठी 22 धावांची गरज असताना लेविस बाद झाला. परंतू याचा खेळावर परिणाम न होऊ देता पोलार्डने शेवटच्या षटकात सुनील नरीनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत जमैकाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

जमैकाने हा सामना 4 विकेट्सने जिंकत यावर्षीचा त्यांचा पहिला विजय नोंदवला.

याआधीही ट्वेंटी20 मध्ये एकाच सामन्यात हॅट्रिक आणि शतक करण्याचा कारनामा इंग्लंडच्या जो डेन्लीने केला आहे. विशेष म्हणजे त्यानेही ही कामगिरी याच वर्षी जुलै महिन्यात केली आहे.

त्याने इंग्लंडमधील टी20 ब्लास्ट स्पर्धेत 6 जुलैला केन्ट संघाकडून खेळताना सरे विरुद्ध हा कारनामा केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचा अध्यक्ष?

अँडरसनचा तो चेंडू खेळायचा कसा? हरभजनचा सचिन तेंडुलकरला प्रश्न