ISL 2018: डुंगलच्या हॅट्रिकमुळे नॉर्थईस्टकडून चेन्नई गारद

गुवाहाटी । हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात नॉर्थईस्ट युनायटेडने खळबळजनक निकाल नोंदविताना चेन्नईयीन एफसीला 3-1 असे हरविले. सैमीनलेन उर्फ लेन डुंगल याची हॅट््ट्रिक त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पूर्वार्धात खाते उघडल्यानंतर त्याने उत्तरार्धात आणखी दोन गोल केले. ही नॉर्थईस्टच्या इतिहासातील तसेच यंदाच्या मोसमात भारतीय खेळाडूने नोंदविलेली पहिलीच हॅट्रिक ठरली.

इंदिरा गांधी अॅथलेटीक स्टेडियमवर नॉर्थईस्टने सहा जानेवारी रोजी एफसी गोवा संघाला 2-1 असे चकविले होते. तो निकाल अपघाती नसल्याचे दाखवून देताना नॉर्थईस्टने आणखी भारदस्त विजय मिळविला. चेन्नईला तिसरा पराभव पत्करावा लागला, तर नॉर्थईस्टने तिसरा विजय मिळविला. चेन्नई 11 सामन्यांत सहा विजय व दोन बरोबरींसह 20 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर कायम राहिले, पण आघाडीवरील बेंगळुरू एफसीला (21 गुण) मागे टाकण्याची मोठी संधी त्यांच्या हातून निसटली. नॉर्थईस्टचे नववे स्थान कायम राहिले. दहा सामन्यांतून त्यांचे दहा गुण झाले. तीन विजय, एक बरोबरी व सहा पराभव अशी त्यांची काामगिरी आहे.

पूर्वार्ध संपण्यास तीन मिनीटे बाकी असताना बचाव फळीतील रिगन सिंगने डुंगलला पास दिला. त्याने छातीवर चेंडू नियंत्रीत करीत डॅनिलो लोपेस सेझारीयोसाठी संधी निर्माण केली. सेझारीयोने दोन प्रतिस्पर्ध्यांना चकवित फटका मारला. चेन्नईचा गोलरक्षक करणजीत सिंगला चेंडू नीट अडविता आला नाही. रिबाऊंड झालेला चेंडू दक्ष डुंगलने नेटमध्ये घालविताना कोणतीही चूक केली नाही.

एका गोलच्या आघाडीमुळे मनोधैर्य उंचावलेल्या नॉर्थईस्टने उत्तरार्धात जोरदार सुरवात केली. या सत्रात केवळ 19 सेकंदांत पाच पासेसच्या अंतराने नॉर्थईस्टने दुसरा गोल केला. सेझारीयोने मध्य क्षेत्रातून डुंगलच्या दिशेने पास दिला. डुंगलने ऑफसाईडच्या सापळ्यातून बाहेर पडत नेटमध्ये चेंडू मारत जल्लोष सुरु केला. त्याची ही धुर्त हालचाल करणजीतसह चेन्नईच्या कुणाच्याच लक्षात आली नाही. त्यांचे ऑफसाईडचे अपील फेटाळले गेले.

डुंगलने 68व्या मिनीटाला हॅट्रिक पूर्ण केली. हालीचरण नर्झारीने डाव्या पायाने त्याला अफलातून पास दिला, तेव्हा डुंगल पेनल्टी किक घेण्याच्या ठिकाणाजवळ होता. त्याने तोल जाण्यापूर्वीच चेंडूला हलकेच नेटची दिशा दिली. यावेळीही करणजीतचा अंदाज चुकला. त्यानंतर डुंगलने कोलांटउड्या घेत प्रेक्षणीय जल्लोष केला.

11 मिनीटे बाकी असताना अनिरुध थापाने चेन्नईचे खाते उघडले, पण त्यांना तेवढ्यावरच समाधान मानावे लागले. पुर्वार्धात सुरवातीला नीरस खेळ झाला. दोन्ही संघ निर्णायक चाली रचू शकले नाहीत. चौथ्या मिनीटाला चेन्नईच्या ग्रेगरी नेल्सनला डावीकडून संधी मिळाली. त्याने नॉर्थईस्टच्या निर्मल छेत्रीला चकवून चेंडूवरील ताबा राखला. त्याने नेटसमोर थोई सिंगच्या दिशेने पास दिला, पण चेंडू त्याच्यापासून फार दूर गेला. 16व्या मिनीटाला इनिगो कॅल्डेरॉन याने उजवीकडून बॉक्समध्ये मारलेला चेंडू जेजे लालपेखलुआ याच्यापाशी गेला. त्याने संतुलन साधत हेडींग करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे हेडिंग चुकले.

निकाल :
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : 3 (सैमीनलेन डुंगल 42, 46, 68)
विजयी विरुद्ध चेन्नईयीन एफसी : 1 (अनिरुध थापा 79)