मला भारतासाठी विश्वचषकात खेळायचं आहे असं त्याने खेळाडूंसाठी असणाऱ्या लॉकरमध्ये लिहून ठेवलं होत !

भारतात होणाऱ्या अंडर १७ फिफा विश्वचषकाचा महासंग्राम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महासंग्रामात भारतीय संघ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारत यजमान असल्यामुळे या विश्वचषकात भारतीय संघाला थेट प्रवेश देण्यात आला आहे.

२१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची या विश्वचषकासाठी घोषणा झाली आणि त्यात एक मराठी नाव चमकले ते अर्थात कोल्हापूरचा अनिकेत जाधव. भारतीय संघात अनिकेत जाधव हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. राईट विंगर म्ह्णून खेळणारा हा गुणी खेळाडू भारतीय संघाचा महत्वाचा भाग आहे. त्याची संघात निवड झाल्यावर त्याचे वडील अनिल जाधव यांची महा स्पोर्ट्सने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमधील काही खास भाग…

प्रश्न – अनिकेतचा फुटबॉल खेळाचा प्रवास कसा सुरु झाला?
उत्तर – कोल्हापूरमध्ये खूप फुटबॉल खेळले जाते. त्यामुळे मलादेखील फुटबॉलची आवड होती. अनिकेतला मी फुटबॉलचे सामने पाहायला घेऊन जायचो. अनिकेत फुटबॉलचे सामने पाहण्यात रमायचा. तेथूनच त्याला फुटबॉल खेळाची गोडी लागली असावी. त्याने फुटबॉल खेळायला सुरुवात केल्यावर त्याची फुटबॉलमधील प्रगती पाहून त्याच्या मामाने त्याला क्रीडा प्रबोधनी पुणे येथे प्रवेश घेण्यास प्रेरित केले. त्यानंतर त्याचा प्रवास थोडा सुकार झाला.

प्रश्न – आर्थिक परिस्थिती जोखमीची असताना तुम्ही त्याला फुटबॉल खेळासाठी लागणारे साहित्य कसे उपलब्ध करून दिले?
उत्तर – अगोदर मी गिरणी कामगार होतो.त्यानंतर आता रिक्षा चालवतो. सुरुवातीच्या काळात त्याच्यासाठी आम्ही फुटबॉलचे पूर्ण उपलब्ध करून द्यायचो. त्यानंतर त्याचे क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड झाल्यापासून आम्ही त्याला फक्त शूज उपलब्ध करून देतो. बाकीचे सर्व साहित्य क्रीडा प्रबोधनी पुरवते.

प्रश्न- अनिकेतची फिफा विश्वचषकासाठी निवड झाल्याचे तुम्हाला कसे कळले?
उत्तर- आम्ही सहकुटुंब अंबाबाईच्या दर्शनाला गेले होतो. मंदिरात जाताना मी अनिकेतला फोन केला. त्यावेळी तो म्हणाला की मिटिंग चालू आहे, मी नंतर फोन करतो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याचा मला फोन आला आणि त्याने सांगितले की, माझी भारतीय संघात निवड झाली आहे. तो क्षण आनंदाचा होता.

प्रश्न- अनिकेतच्या यशाबद्दल तुम्ही काय म्हणाल?
उत्तर – आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठी कामगिरी त्याने केली आहे. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. जे स्वप्न त्याने पहिले होते, ते त्याने पूर्ण करून दाखवले. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. त्याने या विश्वचषकात उत्तम कामगिरी करून भारतीयांची मने जिंकावी.

प्रश्न – तुम्ही अनिकेतच्या यशाचे सूत्र काय आहे हे सांगू शकाल का?
उत्तर – अनिकेतच्या यशाचे सूत्र सांगायचे झाले तर मी सांगेन की ‘कष्ट’. या ठिकाणी पोहचण्यासाठी अनिकेतने खूप कष्ट केले आहे. त्याचे फळ देखील त्याला मिळाले आहे. याला मी त्याच्या यशाची सुरुवात म्हणेन. यशाला मेहनती शिवाय पर्याय नाही.

प्रश्न- अनिकेतच्या बाबतची कोणती खास गोष्ट तुम्ही सांगू शकाल का?
उत्तर – अनिकेत खूप जिद्दी खेळाडू आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळावे म्हणून तो खूप कष्ट घेत होता. त्याने त्याला दिलेल्या लॉकरमध्ये ‘मला विश्वचषक खेळायचा आहे’ असे लिहले होते. त्यामुळे त्याने किती ध्येय ठेवून कष्ट घेतले आहेत याचा अंदाज येतोय. त्यासाठी त्याने मेहनत घेतली आणि ती गोष्ट साध्य करून दाखवली.