हाँग काँग ओपन: एचएस प्रणॉय पराभूत

जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताच्या एचएस प्रणॉयला आज हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला जपानच्या काझुमका सकाईने पराभूत केले.

५४ मिनिटे चाललेली ही लढत रंगतदार झाली. पहिल्या सेटमध्ये प्रणॉयने पूर्णपणे वर्चस्व राखले होते. त्याने हा सेट २१-११ अश्या फरकाने जिंकला. परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानी असणाऱ्या सकाईने सामन्यात पुनरागमन करत  प्रणॉयला एकही संधी दिली नाही.

त्याने २१-१० अश्या फरकाने दुसरा सेट जिंकून सामन्यात बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये प्रणॉयने लढत देण्याचा प्रयत्न केला परंतु सकाईने या सेटवर २१-१५ अश्या फरकाने कब्जा केला आणि सामनाही जिंकला.

या पराभवामुळे प्रणॉयचे दुबईत होणाऱ्या सुपर सिरीज फायनल स्पर्धेचे स्वप्न मात्र भंगले आहे.