५ अशी कारणे ज्यामुळे भारताचा बेंगलोर वनडेमध्ये झाला पराभव !

गुरुवारी झालेल्या भारत वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले तर गोलंदाजांनी सामन्यात नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.

भारतीय फलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाने उभारलेला ३३४ धावांचा डोंगर सर करणे अवघड नव्हते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कधीही हार न मानणे ही प्रवृत्ती दाखवून दिली. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा भारत १३५ धावांवर १ बाद असा होता. पण तेव्हाच रोहित बाद झाला आणि सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली.

पाहुयात काय आहेत ती ५ कारणे ज्यामुळे भारताला काल पराभवाचा सामना करावा लागला:

५. फलंदाजीच्या मधल्या फळीतील अनुभवाची कमी

काल भारताचा स्कोर २३५ वर ४ बाद वरून ३०० वर ७ बाद असा झाला. मधल्या फळीतील फलंदाज म्हणजे मनीष पांडे, केदार जाधव व हार्दिक पंड्या यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांनी मोक्याच्या क्षणी आपली विकेट सोडून संघाला अडचणीत आणले. मनीष पांडेला महेंद्रसिंग धोनीच्या जागी फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती पण त्याला त्या संधीच सोने करता आले नाही. अक्सर पटेलनेही फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये काल निराशाजनक कामगिरी केली.

सामन्याच्या एका क्षणाला भारत सहज जिंकेल असे वाटत असताना अनुभवहीन मधल्या फळीतील फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी चालू केली आणि आपल्या विकेट्स गमावून बसले.

४. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची उत्तम गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या षटकात यष्टीमधे गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले. केन रिचर्डसन, नेथन कॉल्टर-नाइल आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी अनुक्रमे ३, २ व १ अश्या विकट घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी किती उत्तम होती हे या वरून समजते की भारताला ३० चेंडूत ५३ धावा आणि धोनी सारखा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक खेळपट्टीवर असून ही भारताला सामना जिंकता आला नाही.

३. धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलणे

कालच्या सामन्यातही हार्दिक पंड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यानंतर केदार जाधव व नंतर मनीष पांडे. यामुळे धोनी फलंदाजीला ७ व्या क्रमांकावर आला. धोनी मागील काही वर्षांपासून ज्या पद्धतीने खेळत आहे त्याला फलंदाजीसाठी लय मिळण्यासाठी काही वेळेची गरज असते त्यामुळे धोनीला एवढ्या उशिरा फलंदाजीला पाठ्वण्या मागचे कारण कळत नाही.

भारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे. धोनीच्या संघातील स्थानावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे भारताला एका फिनिशरची गरज लागणार हे नक्की. असे असताना देखील पंड्या सारख्या लवकर धावा करू शकणाऱ्या फलंदाजला चौथ्या क्रमांकावर पाठ्वण्या मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

२. रोहित शर्मा धावबाद

अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने भारताला सुरेख सुरुवात मिळवून दिली होती. भारत १ बाद १३५ अश्या सुस्थितीत होता पण तेव्हा नेमका रोहित आणि विराट यांच्यातील ताळमेळाच्या आभावमुळे रोहित धावाबाद झाला. रोहित शर्मा चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याचा नेहमीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला फॉर्म राहिला आहे. त्यामुळे चांगली सुरुवात मिळाल्यानंतर भारताला रोहितकडून अपेक्षा होती.

विराट कोहली त्यानंतर संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि तो मागील सामन्याप्रमाणेच यष्टीचित झाला. २०१५ च्या विश्वचषकापासून भारताने केलेल्या धावांपैकी ६०% धावा विराट, रोहित आणि शिखर धवनने केल्या आहेत. त्यामुळे भारत टॉप ३ फलंदाजांवर जरा जास्तच अवलंबून असतो.

१. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज

ऑस्ट्रेलियाचे सध्याचे दोन्ही सलामीचे फलंदाज ताबडतोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. एरोन फिंचने आपल्या मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत चांगली फटकेबाजी केली. तर डेविड वॉर्नरने भारताच्या कोणत्याच गोलंदाजाला टिकू दिले नाही. वॉर्नरने १२४ धावा केल्या तर फिंचचे मालिकेतील दुसरे शतक ६ धावांनी हुकले. भारताच्या गोलंदाजांना ३६ व्या षटकापर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती.

भारताने या सामन्यात आपले प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली होती, ज्यामुळे भारताला विकेट घेणे अवघड गेले.