सामन्यागणिक बहरतोय एफसी गोवा स्ट्रायकर कोरो

हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघाचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास मैदान गाजवितो आहे. स्पेनच्या या स्ट्रायकरची कामगिरी सामन्यागणिक बहरते आहे. दुसरा मोसम संपण्यापूर्वीच त्याने आयएसएलच्या तसेच आपल्या कारकिर्दीत उच्चांक प्रस्थापित केले आहेत. दुसऱ्या मोसमाची फायनल बाकी असताना त्याच्या खात्यात 34 गोल जमा झाले आहेत.
 
गेल्या वर्षी पदार्पणात त्याने 18 गोल करून खळबळ उडवून दिली होती. यंदाही त्याचा धडाका रोखणे अशक्य होत असून त्याने आतापर्यंत 16 गोल केले आहेत. विचारही करता येणार नाही असे काही घडले किंवा सुनील छेत्रीने सुमारे नऊ गोल केले तरच कोरोमीला गोल्डन बुट मिळणार नाही. अन्यथा सलग दुसऱ्या मोसमात तो या पुरस्काराचा मानकरी ठरेल. कोरोचे वय 36 आहे आणि ते विाचारात घेतले तर हा पराक्रम थक्क करणारा ठरतो.
 
मोसमाच्या प्रारंभी अनेकांना कोरो मागील मोसमाइतका भेदक ठरेल का असा प्रश्न पडला होता. गेल्या मोसमात त्याच्या जोडीला मॅन्युएल लँझरॉ होता. या दोघांची जोडी चांगलीच चालली होती. यंदा लँझरॉतने एटीकेशी करार केला, पण कोरोचा धडाका सुरुच आहे.
 
मोसमापूर्वी कोरो म्हणाला होता की, गोल वेगवेगळ्या मार्गांनी होतात. स्कोअरिंगसाठी एकच जोडी असायला हवी असे नाही. हा सांघिक खेळ आहे आणि खेळाडूंच्या वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून राहायचे नाही असाच दृष्टिकोन संघाचे बलस्थान ठरतो.
 
सर्जिओ लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाने सलग दुसऱ्या मोसमात प्रतिस्पर्धी संघांना गोलच्या क्रमवारीत पिछाडीवर टाकले आहे. संघाच्या आक्रमणास प्राधान्य देणाऱ्या धोरणाची धुरा समर्थपणे पेलण्यात कोरो आघाडीवर राहिला आहे. एफसी गोवाचे वैशिष्ट्य ठरलेल्या भेदक चालींचे फिनिशिंग करण्यापासून सहकाऱ्यांसाठी संधीची निर्मिती असे सारे काही कोरो करू शकतो.
 
लॉबेरा यांनी सांगितले की, कोरो हा अत्यंत चांगला खेळाडू आहे. तो दर्जेदार खेळाडू आहे. मी ज्यांच्याबरोबर प्रशिक्षक म्हणून राहिलो आहे त्यांतील तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे.
 
गोलच्या क्रमवारीत कोरो आघाडीवर आहेच. याशिवाय अॅसिस्टच्या क्रमवारीतही तो दुसरा आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत सात अॅसिस्ट जमा आहेत.
 
कोरोकडे दोन्ही पायांनी गोल करण्याचे कौशल्य आहे. लॉबेरा यांच्या कार्यकाळात एफसी गोवा संगात त्याचे कौशल्य आणखी बहरले. तो बचाव फळीला चकवून धुर्तपणे मुसंडी मारतो. तो बचावातील मोकळ्या जागा हेरून आगेकूच करतो. पेनल्टी बॉक्समधील धुर्त खेळाडू, जो चाल रचण्यास दबा धरून बसलेला असतो असा दरारा कोरोने निर्माण केला आहे. त्यामुळे तो निर्णाय टप्यात प्रतिस्पर्धी बचाव फळीसाठी भेदक आणि धोकादायक ठरतो.
 
कोरोचा दुसरा गोल्डन बूट नक्की झाला असला तरी तो सर्वोच्च करंकाचे अर्थात आयएसएल जेतेपदाचे लक्ष्य ठेवेल. एफसी गोवाने अंतिम फेरी गाठली असल्यामुळे कोरोचा दृष्टिकोन असाच असेल. प्रत्येकाची अपेक्षा सुद्धा तशीच आहे. गोल्डन बुटसह आयएसएल करंडक जिंकण्याची सुवर्णसंधी त्याला आहे. ही क्षमता तो पणास लावणार का आणि यशस्वी ठरणार का याची उत्सुकता आहे.