Video: हात फ्रॅक्चर असताना संघहिताला प्राधान्य देत त्याने केली एकाच हाताने फलंदाजी

दुबई। शनिवारपासून 14 व्या एशिया कप स्पर्धेला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशने 137 धावांनी विजय मिळवला.

हा विजय मिळवला असला तरी बांगलादेशला मोठा झटका बसला आहे. त्यांचा सलामीवीर फलंदाज तमीम इक्बालच्या डाव्या मनगटाला फ्रॅक्चर झाले आहे.

मात्र दुखापतग्रस्त असतानाही बांगलादेशची 9 वी विकेट गेल्यानंतर तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि आपली विकेट वाचवत शतक करणाऱ्या मुस्तफिकुर रहिमबरोबर 32 धावांची भागीदारीही रचली. तसेच बांगलादेशला 261 धावांचा टप्पा गाठून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण सुरुवातीलाच दुसऱ्या षटकात तमीमला चेंडू हाताला लागला. त्यामुळे त्वरीत त्याने फिजिओथेरपिस्टला बोलावून घेतले. त्यानंतर तो 3 चेंडूत 2 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.

त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. त्याच्या हाताचे स्कॅन करण्यात आले तेव्हा त्याच्या डाव्या हाताच्या मनगटात फ्रॅक्चर आहे हे समजले.

पण त्यानंतरही तो 47 व्या षटकात बांगलादेश 9 बाद 229 धावांवर असताना पुन्हा फलंदाजीसाठी आला. त्याने डाव्या हाताच्या ग्लोव्हला विशेष पॅडचा आधार दिला होता.जेणेकरुन त्याला खेळता येईल.

त्याने यात एकाच हाताने फलंदाजी करताना एकच चेंडू खेळला आणि एकही धाव केली नाही. पण त्याने दुखापत असतानाही संघहिताला प्राधान्य दिल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले.

त्याला फ्रॅक्चर असतानाही मैदानात आलेले पाहुन खेळाडूंसह अनेकांना आश्चर्य वाटले होते.

मात्र आता या संपूर्ण स्पर्धेला तमीमला मुकावे लागणार आहे. तसेच त्याला जवळजवळ सहा आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. त्याच्या ऐवजी आता बांगलादेशकडे नाझमुल हुसेन शान्तो या फलंदाजाचा पर्याय आहे.

बांगलादेशचा एशिया कप 2018 स्पर्धेतील पहिला विजय-

या सामन्यात बांगलादेशकडून रहिमने 150 चेंडूत 144 धावांची खेळी केली. तर मोहम्मद मिथूनने 63 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून पुनरागमन करणाऱ्या लसिथ मलिंगाने 23 धावा देत 4 विकेट घेतल्या.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला 262 धावांचे आव्हान दिले. या  आव्हानाचा पाठलाग करताना मात्र श्रीलंकेची फलंदाजी अपयशी ठरली.

त्यांच्याकडून दिलरुवान परेराने सर्वाधिक 29 धावा केल्या. बांगलादेशकडून मरशरफ मोर्तझा, मुस्तफिजूर रेहमान आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेने 35.2 षटकात सर्वबाद 124 धावा केल्या.

दुखापतग्रस्त असतानाही मैदानात उतरले होते हे खेळाडू-

या आधीही अनेकदा क्रिकेटपटू दुखापतग्रस्त असताना मैदानात खेळण्यासाठी उतरले आहेत. यात भारताचा अनिल कुंबळे आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी महान कर्णधार ग्रॅमी स्मिथची.

कुंबळेने जबडा तुटला असताना गोलंदाजी करत ब्रायन लाराला बाद केले होते. तर ग्रॅमी स्मिथ हा 2009 मध्ये सिडनी कसोटीत पहिल्या डावात एक हात मोडला असताना संघासाठी दुसऱ्या डावात आणि सामन्यातील चौथ्या डावात 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावेळी तो चक्क 26 चेंडूही खेळला.

महत्त्वाच्या बातम्या- 

Video: एक हात मोडला असताना तो आला मैदानात, पुढे काय झाले पहाच!

रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध शेवटच्या कसोटीत केलेला हा विक्रम राहिला दुर्लक्षित