फेडेरेशन कप कबड्डी स्पर्धेसाठी हिमाचल प्रदेशच्या संघाची घोषणा

हिमाचल प्रदेशच्या बिलासपूरमधील केहलूर खेळ प्रांगणात हिमाचल प्रदेशच्या महिला कबड्डी टीमच्या सराव शिबिराचा काल समारोप झाला. टीमचे प्रशिक्षक रतन लाल यांनी सांगितलं की,या शिबिराचे आयोजन ९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या फेडरेशन कप कबड्डी चषक धर्तीवर केलं गेलं होत.

“सध्या हिमाचल प्रदेशचे नाव राष्ट्रीय स्तरावर अग्रेसर आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामीण स्तरावरून नव-नवे प्रतिभावंत खेळाडू उदयास येत आहेत आणि निश्चितच ही हिमाचलसाठी अभिमानाची गोष्ट आहे. हिमाचल प्रदेशच्या महिला टीमने नुकतेच गोल्ड मेडल जिंकून क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. ” असेही ते पुढे म्हणाले.

हिमाचल प्रदेशच्या कबड्डी टीमने फायनलमध्ये दिल्लीला हरवून चालू असलेलया “खेल इंडिया स्कूल गेम्स” मध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यामुळे मुलींनी आपल्या राज्याची मान गर्वाने उंचावून इतिहास रचला आहे. कर्णधार प्रियांका नेगीच्या उपस्थितीत टीमने पूजापाठ करून देवाकडे हिमाचलसाठी आणखी एक गोल्ड मेडल जिंकण्याची मनोकामना केली.

आपल्या प्रशिक्षकांचा आशिर्वाद घेत सगळ्यांनी हात जोडून मैदानाला गोल वेढा मारला. दरम्यान जय बजरंग बली व जय कबड्डीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला. कर्णधार प्रियांका नेगी म्हणाली की,तिला विश्वासच नाही तर खात्री आहे की फेडरेशन कप जिंकून हिमाचलचे नाव पुन्हा एकदा उंचावेल.

संपूर्ण टीमने या आठ दिवसीय शिबिरात कठोर मेहनत घेतली आहे. हिमाचल प्रदेशच्या महिला कबड्डी टीममध्ये प्रियांका नेगी(कर्णधार), कविता(उपकर्णधार ), निधी, ज्योती, पुष्पा, ललिता, विशाखा, सुषमा, भावना, रीना, आणि सारिका यांचा समावेश आहे.

या वेळी कबड्डी असोसिएशन बिलासपूरचे महासचिव विजय चंदेल आणि संघव्यवस्थापक संजीव कुमार हे देखील उपस्थित होते.