बालारफीक शेख- अभिजित कटके १० दिवसांत पुन्हा आमने-सामने? २८ डिसेंबरपासून पुण्यात हिंद केसरी स्पर्धा

पुणे । भारतीय कुस्ती संघ आणि नगरसेवक मयुर कलाटे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या वतीने मातीतील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.

ही स्पर्धा २८ ते ३० डिसेंबर दरम्यान सोमाटणे फाटा येथे होणार आहे, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे सहयोगी उपाध्यक्ष विजय बराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, हिंद केसरी अमोल बराटे, अमोल बुचडे, मुख्य आयोजक नगरसेवक मयुर कलाटे व पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले आदी उपस्थित होते.

विजय बराटे म्हणाले, ह्या स्पर्धेला युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असून, मातीवरील कुस्तीची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत ३२ राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत. सेनादल, रेल्वे, हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांचे प्रत्येकी दोन संघ सहभागी होणार आहेत.

फ्री स्टाइल प्रकारात होणारी ही स्पर्धा ५७, ६५, ७४, ८६, ९७ व १२५ किलो वजनी गटात होणार आहे. या स्पर्धेत राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पधेर्तील सुवर्णपदक विजेता सत्यव्रत कोटियन, सुनीलकुमार, परवीन राणा, तसेच महाराष्ट्राकडून नुकताच महाराष्ट्र केसरी किताब विजेता बालारफीक शेख, अभिजित कटके, राहुल आवारे, उत्कर्ष काळे, विजय पाटील असे अनेक नामवंत मल्ल या सहभागी होणार आहेत.

हिंद केसरी नावाचा वापर करण्याबाबत न्यायालयाचा निर्णय व कायद्याच्या चौकटीत राहून हिंद केसरी किताबाच्या नावाचा वापर केला जाईल, असे बराटे यांनी सांगितले. न्यायालयाचा अवमान होईल, असे काहीही आमच्याकडून घडणार नाही.

सचिन घोटकुले म्हणाले, वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा प्रथमच मातीवर होत आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धेचे नियोजन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्पर्धेच्या ठिकाणची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेसाठी ५० फूट रुंद आणि १०० फूट लांब असे दोन मातीचे आखाडे तयार करण्यात आले आहेत. तब्बल १२ हजार कुस्तीप्रेमी बसतील अशी गॅलरी तयार करण्यात आली आहे. मल्लांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील उत्तमरित्या करण्यात येणार आहे. विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.

नगरसेवक मयुर कलाटे म्हणाले, स्पर्धेचे उद््घाटन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेच्या सुरुवातीला तुज्यात जीव रंगला… फेम लाडू याची सलामीची कुस्ती रंगणार आहे. स्पर्धेच्या समारोपप्रसंगी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा मर्यादित मल्लसम्राट आणि मावळ तालुका मर्यादित मल्लसम्राट किताबाची स्पर्धा रंगणार
मातीवरील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसोबतच जिल्हा मर्यादित मल्लसम्राट किताबाची स्पर्धा आणि मावळ तालुका मर्यादित मल्लसम्राट किताबाची स्पर्धा शुक्रवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी रंगणार आहे. पुणे जिल्हा व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने या स्पर्धा होणार आहेत. विजेत्यांना मानाची गदा आणि रोख रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याचे मुख्य आयोजक सचिन घोटकुले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

२०१८च्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी

Maharashtra Kesari: बुलढाण्याचा बालारफिक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी अशी आहे १६ खेळाडूंची टीम इंडिया

बाॅक्सिंग डे टेस्टमधून टीम इंडियाचा हा शिलेदार जवळपास बाहेर

२० वर्षापूर्वी केलेल्या मास्टर ब्लास्टरच्या त्या विक्रमाला विराट कोहली देणार धक्का ?