शालेय हॉकी स्पर्धा: सेंट जोसेफ संघाने पटकावले विजेतेपद

पुणे : खडकीच्या सेंट जोसेफ संघाने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित  जिल्हास्तरीय शालेय हॉकी स्पर्धेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील हॉकी स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत सेंट जोसेफ संघाने सेंट पॅट्रिक्स संघावर ३-० ने मात केली आणि विजेतेपद पटकावले. या लढतीच्या पाचव्याच मिनिटाला शिवम पाटीलने गोल करून सेंट जोसेफ संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर दहाव्या मिनिटाला शालमोन पाटोळेने गोल करून सेंट जोसेफ संघाची आघाडी वाढवली. पूर्वार्धात सेंट जोसेफ संघाकडे २-० अशी आघाडी होती. यानंतर २२ व्या मिनिटाला शिवम पाटीलने गोल करून सेंट जोसेफ संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून सेंट जोसेफने विजेतेपद पटकावले.
यानंतर अनिकेत आग्रेच्या हॅटट्रिकच्या जोरावर मॉडर्न हायस्कूलने आलेगावकर हायस्कूलवर ३-०ने मात करून तिसरा क्रमांक मिळवला. लढतीच्या तिस-याच मिनिटाला अनिकेत आग्रेने गोल करून मॉडर्न हायस्कूलला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात मॉडर्न संघाकडे १-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात अनिकेतने (१७, २० मि.) आणखी दोन गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, उपांत्य लढतीत सेंट जोसेफ संघाने मॉडर्न हायस्कूलवर १-०ने मात केली. यात केदार चव्हाणने नवव्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. मॉडर्न हायस्कूलच्या मुलांनी बरोबरी साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यात त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. दुस-या उपांत्य लढतीत सेंट पॅट्रिक्स संघाने आलेगावकर हायस्कूल संघावर ३-०ने मात केली. यात सेंट पॅट्रिक्सकडून रोहन इंदलकर (५ मि.), समर्थ गायकवाड (१२ मि.) आदित्य पाटील (२२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.