हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिना विजयाची हॅट्ट्रीक करण्यास आतुर

भुवनेश्वर। ओडिसा, भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (6डिसेंबर) अ गटातील अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स असा सामना होणार आहे.

जागतिक क्रमवारीत 2ऱ्या स्थानावर असणाऱ्या अर्जेंटिनाने या विश्वचषकात सलग दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात स्पेनवर 4-3 असा निसटता विजय मिळवला तर न्यूझीलंडला 3-0 अश्या मोठ्या फरकाने पराभूत केले आहे.

तसेच 28 वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या फ्रान्सला मात्र दोन सामन्यात एक पराभव आणि एक बरोबर ह्या निकालांवर समाधान मानावे लागले. त्यांना पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 1-2 असा पराभव आणि स्पेनला त्यांनी 1-1 असे बरोबरीत रोखले. यामुळे ते पहिला विजय मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे.

हे दोन संघ आज विश्वचषकात तिसऱ्यांदा आमने-सामने येणार असून पहिल्या दोन्ही विश्वचषकातील सामन्यात फ्रान्सनेच विजय मिळवला आहे. तसेच 2013पासून या दोन संघामध्ये एक सामना झाला असून यामध्ये अर्जेंटिनाने विजय मिळवला आहे.

अर्जेंटिना संघाने या विश्वचषकात दोन सामन्यात एकूण सात गोल केले आहेत. यामध्ये मझील्ली ऑग्स्टीनने दोन सामन्यात तीन तर आणि पेईलाट गोंझेलोने दोन गोल केले असून विला लुकास आणि मार्टीनेझ लुकासनेही त्यांना योग्य साथ दिली आहे.

फ्रान्स हा जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर आहे. त्यांनी दोन सामन्यात दोन गोल केले असून कर्णधार चारलेट विक्टर आणि क्लेमेंट टिमोथी यांनी हे गोल केले आहे. तसेच त्यांचा गोलकिपर थिफ्री आर्थरनेही या सामन्यांमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली आहे.

आजच्या सामन्यात अर्जेंटिना विजयाची हॅट्ट्रीक पूर्ण करण्याच्या तर फ्रान्स पहिला विजय मिळवण्याच्या इराद्याने उतरणार आहे.

आज होणाऱ्या अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

अर्जेंटिना- इबारा पेड्रो (कर्णधार), विवाल्दी जुआन (गोलकिपर), पेईलाट गोंझेलो, गिलार्डी जुआन, ऑर्टीज इग्नासिओ, लोपेझ जुआन, पॅरेदेस मॅटीअस, मेनीनी जोक्कीन, विला लुकास, रे मॅटीस, मार्टीनेझ लुकास, मझील्ली ऑग्स्टीन, सीसीलिओ निकोलस, रोस्सी लुकास, बुगाल्लो ऑग्स्टीन, कॅसेल्ला माइका, बेट्टाग्लिओ थॉमस (गोलकिपर), सॅंटीनो थॉमस (गोलकिपर)

फ्रान्स- चारलेट विक्टर (कर्णधार), विक्टर चार्ल्स, बामगर्टन गॅस्पर्ड, ब्रॅन्की मॅक्सिमिलियन, क्लेमेंट टिमोथी, कोसिने एरिस्टाइड, डॅमंट निकोलस, जीन-बॅप्टिस्ट फर्ग्युस,  ह्यूगो जेनस्टेट टॉम जेनस्टेट, गोएत फ्रान्कोइस, लॉकवुड व्हिक्टर, मॅसन चार्ल्स, पेटर्स-डीयूट्झ क्रिस्टोफोरो, रॉगेयू ब्लेज, सौनियर कोरेन्टिन(गोलकिपर), थिफ्री आर्थर (गोलकिपर), टायनेवेझ इतियेन, वॅन स्ट्रॅटन पीटर.

महत्त्वाच्या बातम्या:

वाढदिवस विशेष: भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

आयपीएल चाहत्यांना मोठा धक्का, २०१९च्या आयपीएलमध्ये दिसणार नाही ही ऑस्ट्रेलियाची स्फोटक जोडी

आयपीएल २०१९च्या लिलावासाठी युवराजची मूळ किंमत मागील वर्षी पेक्षा तब्बल एक कोटीने कमी!!