हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (7 डिसेंबर) गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने नवख्या चीन संघावर 11-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

या सामन्यात तब्बल आठ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गोल केले. यामध्ये गोवर्स ब्लेकने हॅट्ट्रीक, ब्रॅंड टीमने दोन तर झलोस्की अॅरन, क्रेग टॉम, हेवर्ड जेरेमी, व्हिटॉन जेक, ऑग्लीवी फ्लीन आणि वॉदरस्पून डायलन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया याआधीच दोन विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे. आज हा त्यांचा या विश्वचषकातील सलग तिसरा विजय ठरला आहे. या तीन सामन्यात त्यांनी एकूण 16 गोल केले आहेत.

पहिल्या सत्रापासूनच ऑस्ट्रेलियाने चेंडूवर वर्चस्व ठेवले होते. त्यांच्याकडून 10व्या मिनिटाला ब्लेकने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. त्याच्या पाच मिनिटांच्या फरकाने अॅरनने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

इंग्लंड आणि आयर्लंडला बरोबरीत रोखणाऱ्या चीनला आज चेंडू मिळवण्याचेच प्रयत्न करावे लागले. तसेच त्यांचा गोलकिपर वांग कॅयु ऑस्ट्रेलियाचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरला.

पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी असताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रातही साजेशी कामगिरी करत 4 गोल केले. यावेळी ब्लेकने त्याचा या विश्वचषकातील आणि या सामन्यातील दुसरा गोल 19व्या मिनिटाला केला. टॉम, ब्लेक आणि जेरेमी यांनी तीन मिनिटांच्या फरकाने गोल केले. तर जेकनेही सत्र संपण्यास एक मिनिट बाकी असताना गोल करत संघाला 6-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

तिसऱ्या सत्रात तीन गोल करत संघाने या विश्वचषकातील एकाच सामन्यात अधिक गोल करणाऱ्या नेदरलॅंड्सला मागे टाकले. नेदरलॅंड्सने मलेशिया विरुद्ध 7-0 गोल करत विजय मिळवला होता.

पहिल्या 45 मिनिटांमध्ये ऑस्ट्रेलियाने 6 पेनल्टी कॉर्नर मिळवल्या. यातील चार पेनल्टी कॉर्नरचे त्यांनी गोलमध्ये रूपांतर केले. हा सामना ऑस्ट्रेलियाच जिंकणार असल्याने चीननेही त्यांचे प्रयत्न मात्र सोडले नाही.

चौथ्या सत्रात चीनला एक पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र त्यांना पहिला गोल करण्यास गोलकिपर लॉवेल टायलरने थांबवले. या सत्रातही फ्लीन आणि ब्रॅंड यांनी प्रत्येकी एक गोल केले.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या

पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत

ती खास बॅट वापरुनही मुंबईकर अजिंक्य रहाणे ठरला दुर्दैवी