हॉकी विश्वचषक २०१८: चिवट चीनसमोर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (7डिसेंबर) ब गटाचे सामना रंगणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध चीन असा होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सामन्याला सुरूवात होणार आहे.

जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानावर असलेला चीन पहिल्यांदाच विश्वचषकात खेळत असून त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात विरोधी संघाला बरोबरीत रोखले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडला 2-2 तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखत 2 गुण मिळवत अ गटाच्या गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

2014 विश्वचषकाचा विजेता ऑस्ट्रेलियाने त्यांचा विजयाचा धडाका कायम ठेवला आहे. साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकत 6 गुणांच्या मदतीने ते उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आयर्लंड विरुद्ध 2-1 असा विजय मिळवत या विश्वचषकात विजयी सुरूवात केली. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

हे दोन्ही संघ आज पहिल्यांदाच विश्वचषकात समोरा-समोर येत आहे. 2013पासून या दोन्ही संघात एकच सामना झाला असून यामध्ये ऑस्ट्रेलियाने 7-0 असा मोठा विजय मिळवला आहे.

इंग्लंड विरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या स्वान मॅथ्यूला रोखण्याचे आव्हान आज चीनसमोर असेल. त्याने या सामन्यात उत्तम चेंडू पास करत ऑस्ट्रेलियासाठी विजयी गोल करण्यात महत्त्वाची भुमिका निभावली होती. तसेच ऑस्ट्रेलियाच्या गोवर्स ब्लेकने तीन सामन्यात दोन गोल केले आहेत.

चीनचे गुवो झियाओपिंग, द्यू तलाके आणि गुवो जीन यांना आतापर्यंत गोल करण्यात यश आले आहे. तर त्यांचा गोलकिपर वांग कॅयुने चांगली कामगिरी करत विरोधी संघाला अधिक गोल करण्यापासून रोखले आहे.

ऑस्ट्रेलिया जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असून त्यांची सलग तिसरा विजय मिळवण्यावर लक्ष असेल. दुसरीकडे चीन त्यांचा मागील सामन्यांमधील फॉर्म कायम ठेवण्याचा आणि स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करणार आहे.

आज होणाऱ्या चीन विरुद्ध आॅस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

ऑस्ट्रेलिया: ओकेडेन एडी (कर्णधार), क्रेग टॉम, वेयर कोरी, हार्वी जेक, विखम टॉम, डेवसन मॅट, बेल्टझ जोशुआ, व्हिटॉन जेक, गोवर्स ब्लेक, डोवार्ड टीम, झलोस्की अॅरन (कर्णधार), स्वान मॅथ्यू, ऑग्लीवी फ्लीन, बीली डॅनियल, लॉवेल टायलर (गोलकीपर), मिटन ट्रेंट, वॉदरस्पून डायलन, ब्रॅंड टीम, चार्टर अॅंड्यू (गोलकीपर), हेवर्ड जेरेमी.

चीन: सू जून, मेंग नान, गुआन क्वांग, गुवो झियाओपिंग, एओ झिवेइ (गोलकिपर), एओ सुझू, इ वेनहुइ, एओ यांग, मेंग दिहावो, सू वेनलिन, सू लिक्सिंग, द्यू चेन (कर्णधार), द्यू तलाके, गुवो झिक्सियांग, इ वेनलाँग, वांग कॅयु (गोलकिपर), एओ वीबाओ, गुवो जीन.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या फ्रान्सचा बलाढ्य अर्जेंटिनावर धक्कादायक विजय

आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: ट्रेविस हेडच्या नाबाद अर्धशतकाने सावरला आॅस्ट्रेलियाचा अडखळता डाव

अश्विनने त्रिफळाचीत केलेल्या शॉन मार्शने मोडला 130 वर्षांचा नकोसा असा विक्रम