हॉकी विश्वचषक २०१८: दोन वेळेच्या विश्वविजेत्या संघावर विजय मिळवत बेल्जियमची उपांत्य फेरीत धडक

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात बेल्जियमने दोन वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीला 2-1 असे पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात बेल्जियमकडून हेंड्रीक्स अलेक्झांडर आणि बून टॉम तर जर्मनीकडून लिंकोगेल डेटर यांनी प्रत्येकी एक गोल केला.

पहिल्याच सत्रात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अटीतटीचा खेळ केला. यावेळी 7व्याच मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र हेंड्रीक्सने मारलेल्या शॉटचे गोलमध्ये रूपांतर न झाल्याने बेल्जियमची आघाडी घेण्याची संधी मुकली.

14व्या मिनिटाला डेटरला बेल्जियमची बचावफळी मोडण्यात यश आले. त्याने मारलेला शॉट सरळ नेटमध्ये गेल्याने जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळाली. याच सत्रात बेल्जियमला एकूण चार पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. गोलकिपर वॉल्टर टोबीयसने उत्तम खेळ करत ते हल्ले रोखले.

दुसरे सत्र बेल्जियमसाठी लाभदायक ठरले. त्यांनी सात वेळा पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला तर तीन पेनल्टी कॉर्नर मिळवल्या. यातील एका पेनल्टी कॉर्नरवर अलेक्झांडरने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. 18व्या मिनिटाला केलेला हा  गोल अलेक्झांडरचा या विश्वचषकातील पाचवा गोल ठरला. तसेच तो सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघामध्ये चांगलीच चुरस दिसून आली. जागतिक क्रमवारीत 3ऱ्या स्थानावर असणाऱ्या बेल्जियमने तिसऱ्या सत्रात त्यांचा खेळ उंचावत जर्मनीचे गोल करण्याचे प्रयत्न रोखले. हे दोन संघ 21वेळा आमने-सामने आले असून जर्मनी 10 सामने जिंकत आघाडीवर आहे.

चौथ्या आणि निर्णायक सत्रात बेल्जियमने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न वाढवले. जर्मनीची बचावफळी तोडण्यात त्यांना यश येत नव्हते. पण 50व्या मिनिटाला टॉमने गोल करत बेल्जियमला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

‘रेड लायन’ या टोपणनावाने ओळखला जाणारा बेल्जियम 2016च्या रिओ ऑलिंपिकचा उपविजेता आहे. त्यांनी या सामन्यात अप्रतिम खेळ करत जर्मनीला एकही पेनल्टी कॉर्नर मिळू दिली नाही.

वॅन डोरेन आर्थर हा सामनावीर ठरला. त्याने बेल्जियमकडून उत्तम बचावात्मक खेळ करत संघाच्या विजयाला हातभार लावला.

तसेच बेल्जियम 15 डिसेंबरला इंग्लंड विरुद्ध उपांत्य सामन्यात खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएल २०१९चा लिलाव कधी आणि कोणत्या चॅनेलवर पहाल?

हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल