हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (12 डिसेंबर) पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड असा झाला. या सामन्यात इंग्लंडने अर्जेंटिनावर 3-2 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.

या सामन्यात इंग्लंडकडून बॅरी मिडलटन, कॅलनन विल आणि मार्टीन हॅरी यांनी प्रत्येकी एक तर अर्जेंटिनाकडून पेईलाट गोंझेलो याने दोन गोल केले.

आजच्या सामन्यात विजय मिळवणे दोन्ही संघासाठी आवश्यक असल्याने दोन्ही बाजूने आक्रमक सुरूवात झाली. या दोन्ही संघांचा विश्वचषकातील इतिहास बघता इंग्लंड संघच वरचढ ठरला आहे. तर 2013पासून यांच्यात झालेल्या 7 सामन्यात इंग्लंडला एकही विजय मिळवता आला नव्हता.

पहिल्याच सत्रात दोन्ही संघाने हल्ले करण्यास सुरूवात केली. यामध्ये इंग्लंडला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाल्या मात्र गोलकिपर विवाल्दी जुआनने ते रोखले. हे सत्र संपले असता सामना 0-0 असा असल्याने दुसऱ्या सत्रात अटीतटीचा खेळ झाला. यामध्ये अर्जेंटिनाला गोल करण्याची संधी होती. गोंझेलोने त्याचा फायदा घेत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.

मिडलटननेही 27व्या मिनिटाला ताकदीचा शॉट मारत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या सत्रात इंग्लंडचेच वर्चस्व राहिले. त्यांनी तब्बल सात पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला. तर दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. सत्र संपण्यास काही सेकंद बाकी असताना विलने गोल करत इंग्लंडला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

इंग्लंड या विश्वचषकातील साखळी सामन्यात एक बरोबरी, एक पराभव आणि एक विजय असा प्रवास करत बाद फेरीत पोहचला होता. यामध्ये त्यांनी न्यूझीलंडला 2-0 असे पराभूत करत उपांत्यपूर्व प्रवेश केला.

2014च्या विश्वचषकात अर्जेंटिना तिसऱ्या स्थानावर राहिला होता. या विश्वचषकातही त्यांनी त्यांची लय कायम ठेवत साखळी फेरीतील पहिले दोन विजय सहज मिळवले. मात्र तिसऱ्या सामन्यात फ्रान्सकडून 3-5 असे मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते तरी 6 गुणांसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश पक्का केला होता.

चौथ्या सत्राच्या 3ऱ्या मिनिटालाच अर्जेंटिनाने पेनल्टी कॉर्नर मिळवला. गोंझेलोने त्याचा या विश्वचषकातील सहावा गोल करत सामना 2-2 असा बरोबरीत आणला. मात्र त्याच्या पुढच्याच मिनिटाला इंग्लंडच्या हॅरीने गोल करत सामना 3-2 असा केला.

शेवटच्या मिनिटाला इंग्लंडच्या बचावफळीने 2016च्या रियो ऑलिंपिक सुवर्ण विजेत्यांना चांगलेच रोखत सामना आपल्या नावे केला. इंग्लंडचा उपांत्यफेरीचा सामना 15 डिसेंबरला असून ते जर्मनी विरुद्ध बेल्जियम यांच्यात जो जिंकेल त्याला भिडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आजपर्यंतची विराट कोहलीची एवढी मोठी चूक कुणीच दाखवून दिली नव्हती

पर्थ कसोटीसाठी त्या मुंबईकर खेळाडूला वगळणार? असा असेल ११ खेळाडूंचा संघ

द वाॅल द्रविडपेक्षाही कोहलीची वाॅल होणार विराट, जाणून घ्या काय आहे कारण