हॉकी विश्वचषक २०१८: आज चीन समोर असणार बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान

भुवनेश्वर। 14 व्या हॉकी विश्वचषकात आज सहावा सामना हा इंग्लंड विरुद्ध चीन या गट ब मधील संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये सुरुवात होईल.

या सामन्यात पहिल्यांदाच विश्वचषक खेळणाऱ्या चीन समोर बलाढ्य इंग्लंडला रोखण्याचे आव्हान असणार आहे.

जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावर असणाऱ्या इंग्लंडला 17 व्या क्रमांकावर असणाऱ्या चीनची जास्त भीती नसेल. त्याचमुळे ते या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील. पण त्याचबरोबर चीनही प्रशिक्षक सँग ऱ्यून किम यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंडला कडवी झुंज देण्यासाठी उत्सूक असतील.

इंग्लंडने 2010 आणि 2014 च्या विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. ते दोन्हीही विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर होते. तसेच 1986 च्या विश्वचषकाचे उपविजेते होते. ही त्यांची विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी आहे.

तसेच त्यांनी यावर्षी पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला 2-1 ने पराभूत करत कांस्य पदक पटकावले होते. त्याचबरोबर 2018 च्या सुलतान अझलान शहा कप स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली होती.

त्यांच्या संघातील मिडफिल्डर बॅरी मिडलटनचा ही चौथी विश्वचषक स्पर्धा आहे. तसेच त्यांचा अनुभवी खेळाडू अॅडम डीक्सोनच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने इंग्लंडकडून 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.

त्याचबरोबर इंग्लंडचा गोलकिपर जॉर्ज पिनेरही चांगल्या लयीत आहे. त्याला  2018 च्या सुलतान अझलान शहा कप स्पर्धेतील सर्वोत्तम गोलकिपरचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच इंग्लंडकडे इयान सोलन आणि हॅरि मार्टीन सारखे हॉकीपटू आहेत.

त्यामुळे आता चीनचा संघ अशा ताकदवान इंग्लंड संघाशी कसे दोन हात करणार हे पहावे लागेल.

तसेच चीनच्या संघानेही लंडनमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्यफेरीत आठवे स्थान मिळवले होते.

चीन आणि इंग्लंड संघ याआधी 2013 पासून फक्त एकदा आमने सामने आले असून या सामन्यातही इंग्लंडनेच बाजी मारली होती.

आज होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध चीन सामन्याचे थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ:

इंग्लंड: गिब्सन हॅरी(गोलकिपर), एम्स डेव्हिड, कॅलनन विल, बॅरी मिडलट, जॉर्ज पिनेर(कर्णधार, गोलकिपर), इयान सोलन(कर्णधार), हॅरि मार्टीन, अॅडम डीक्सोन, गॉल जेम्स, ग्लेगोर्ने मार्क, रॉपर फिल (कर्णधार), सॅनफोर्ड लिआम, टेलर ल्यूक, वॉलेस जॅचरी, वॉलर जॅक, होर्न मायकल, कोंडोन डेव्हिड, अॅन्सेल लिआम.

चीन: सू जून, मेंग नान, गुआन क्वांग, गुवो झियाओपिंग, एओ झिवेइ (गोलकिपर), एओ सुझू, इ वेनहुइ, एओ यांग, मेंग दिहावो, सू वेनलिन, सू लिक्सिंग, द्यू चेन (कर्णधार), द्यू तलाके, गुवो झिक्सियांग, इ वेनलाँग, वांग कॅयु (गोलकिपर), एओ वीबाओ, गुवो जीन.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षांनंतर विश्वचषकात खेळण्यास आर्यलॅंड सज्ज

हॉकी विश्वचषक २०१८: फ्रान्सवर न्यूझीलंड ठरला भारी

टीम इंडियाला मोठा झटका, पृथ्वी शाॅ पहिल्या कसोटीतून बाहेर