हॉकी विश्वचषक २०१८: रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियम विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (2 डिसेंबर) झालेल्या रंगतदार लढतीत भारत विरुद्ध बेल्जियम संघाचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, सिम्रनजीत सिंग आणि बेल्जियमकडून हेंड्रीक्स अलेक्झांडर आणि गॉगनार्ड सिमॉन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आनंद दुणावला होता. आजच्या सामन्यात बलाढ्य बेल्जियम विरुद्ध त्यांनी सावध खेळाला सुरूवात केली.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नर मिळाली. पण भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेशने उत्तमरीत्या तो गोल होण्यापासून रोखला. तसेच हार्दीक सिंगने बेल्जियमच्या मिडफिल्डला त्याच्या शैलीने चांगलाच त्रास दिला.

श्रीजेशला मात्र अलेक्झांडरचा पेनल्टी कॉर्नर अडवता आला नाही. 8व्या मिनिटाला आलेल्या गोलने बेल्जियम 1-0 असा पुढे होता. पहिल्या सत्रात जरी बेल्जियमचा गोल झाला असला तरी भारताचा गोलकिपर पीआर श्रीजेशने विरोधी संघाचे दोन हल्ले रोखले.

तसेच भारताला पहिल्या 15 मिनिटांत आघाडी घेण्याची संधी होती मात्र मनदीप सिंगकडून ती थोडक्यात मुकली. दुसऱ्या सत्रात ललित कुमार उपाध्याय आणि दिलप्रीत सिंग या जोडीने खेळ उंचावण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय संघाला बेल्जियमची बचाव फळी मोडण्यात अपयश आले.

जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर असलेला भारत 30 मिनिटे पूर्ण झाली असता गोलअभावी 0-1 असा मागे राहिला.

तिसरे सत्र भारतासाठी लाभदायक ठरले. 40 व्या मिनिटाला वरूण कुमारने भारताला मिळवून दिलेल्या पेनल्टी स्ट्रोकचे ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतर केले. यामुळे सत्रअखेर सामना 1-1 असा बरोबरीत राहीला.

चौथ्या आणि निर्णायक सत्रात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन गोल करणाऱ्या सिम्रनजीतने 47व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. तर बेल्जियमच्या सिमॉनने 56व्या मिनिटाला गोल करत भारताचे सामना जिंकण्याचे स्वप्न भंग केले.

या सामन्यात भारताला पहिली संधी निर्माण करून देणारा वरूण सामनावीर ठरला. भारताचे दोन सामन्यात चार गुण झाले असून क गटात पहिल्या स्थानावर आहेत. तर बेल्जियमचेही समान गुण असल्याने उपांत्यपूर्व फेरीत कोण प्रवेश करणार हे दोन संघाच्या पुढील सामन्यांमधून समजणार आहे.

दोन्ही संघाचे पुढील सामने 8 डिसेंबरला होणार आहे. भारत कॅनडा विरुद्ध तर बेल्जियम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

अॅडलेड कसोटीत भारतीय फलंदाजांसाठी ही गोष्ट ठरु शकते धोकादायक

तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामने