हॉकी विश्वचषक २०१८: भारत-बेल्जियम संघात रंगणार ‘कांटे की टक्कर’

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकातील दहावा सामना आज (2 डिसेंबर) भारत विरुद्ध बेल्जियम असा होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.

हे दोन संघ विश्वचषकात चौथ्यांदा आमने सामने येणार आहेत. याआधी या दोन संघामध्ये विश्वचषकात झालेल्या 3 सामन्यापैकी 2 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एका सामन्यात बेल्जियमने विजय मिळवला आहे. तसेच 2013 पासून विश्वचषक व्यतिरिक्त हे दोन संघ 19 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये बेल्जियमने 13 तर भारताने 5 सामन्यात विजय मिळवला असून एक सामना अनिर्णीत राहिला.

28 नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 5-0 असे सहज पराभूत केले होते. या सामन्यात सिम्रनजीत सिंगने दोन गोल केले.

तसेच सिम्रनजीत आणि बर्थ-डे बॉइज चिंग्लेसना सिंग, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोल करणारा आकाशदिप सिंग हे तिघे आजच्या सामन्यात कसा खेळ करणार याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असेल.

‘रेड लायन’ या टोपणनावाने ओळखला जाणारा बेल्जियम 2016च्या रिओ ऑलिंपिकचा उपविजेता आहे. त्यांनीही कॅनडावर 2-1 असा विजय मिळवत विश्वचषकाला उत्तम सुरूवात केली. पण या सामन्यातील त्यांचा खेळ तेवढा साजेशा नव्हता.

बेल्जियमकडून डेनायर फेलीक्स, लुपार्ट लॉइक आणि बून टॉम यांनी कॅनडा विरुद्धच्या सामन्यात अप्रतिम खेळ केला होता. आजच्या सामन्यातही तसा खेळ करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

भारताची या विश्वचषकामध्ये सुरूवात चांगली झाली मात्र जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला बेल्जियम त्यांना आज चांगलीच टक्कर देऊ शकतो. तर आज जो संघ सामना जिंकेल तो सरळ उपांत्यपूर्व फेरीत जाणार असल्याने हा सामना दोन्ही संघासाठी करो वा मरो असणार आहे.

तसेच जागतिक क्रमवारीत भारत 5व्या स्थानावर आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दूरदर्शनवर होणार आहे.

असे आहेत संघ,

भारत: मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलकिपर), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिम्रनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलकिपर),

बेल्जियम: ब्रिल्स थॉमस (कर्णधार), वॅन डोरेन आर्थर, डोहमेन जॉन-जॉन, वॅन युबेल फ्लोरेंट, बोकार्ड गॉथियर, स्टॉकब्रोक्स इम्मानुअल, डेनायर फेलीक्स, वॅनस्च विन्सेंट, लुपार्ट लॉइक, वेगनेझ विक्टर, बून टॉम, हेंड्रीक्स अलेक्झांडर, गॉगनार्ड सिमॉन, डोकियर सेबास्टीन, चार्लीयर सेड्रीक, डे कॅरपेल निकोलस, डे स्लूवर आर्थर

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

कसोटी मालिकेत विराटपेक्षा हा खेळाडू करणार सर्वाधिक धावा, आॅस्ट्रलियाच्या दिग्गजाची भविष्यवाणी

ISL 2018: मोसमाच्या मध्यालाच चेन्नईवर जेतेपद गमावण्याची वेळ

हॉकी विश्वचषक २०१८: अटीतटीच्या लढतीत जर्मनीचा चार वेळेचा विश्वविजेत्या पाकिस्तानवर विजय