हॉकी विश्वचषक २०१८: टीम इंडिया करणार का विश्वचषकातील पराभवाचा हिशोब चुकता?

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (13 डिसेंबर) उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना यजमान भारत विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरूवात होईल.

भारताने साखळी फेरीतील तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सोडवला आहे. क गटात 7 गुणांसह अव्वल स्थानावर असल्याने ते थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत.

नेदरलॅंड्स मात्र साखळी फेरीतील दोन सामने जिंकला तर एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्यासाठी त्यांना कॅनडा विरुद्ध बाद फेरीत खेळावे लागले. या सामन्यात 5-0 असा विजय मिळवत ते उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5-0 असा मोठा विजय मिळवत विश्वचषकाला उत्तम सुरूवात केली आहे. नेदरलॅंड्स पहिल्या सामन्यात मलेशिया विरुद्ध 7 गोल करत एकतर्फी विजय मिळवला होता.

भारताकडून ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंग या दोघांनी तीन सामन्यात प्रत्येकी तीन गोल केले आहेत. हरमनप्रीत सिंगनेही दोन गोल केले आहेत.

नेदरलॅंड्सच्या ब्रिंकमन थिएरी आणि जेरोइन हर्ट्झबेगर या दोघांना रोखण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे. या दोघांनीही चार सामन्यात प्रत्येकी तीन गोल केले आहेत. आजच्या सामन्यात डिफेंडर द वँग सँडर हा कॅनडा विरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने तो स्पर्धेबाहेर गेला आहे.

या विश्वचषकात नेदरलॅंड्सने चार सामन्यात 18 गोल केले आहेत. भारताचे तीन सामन्यात 12 गोल आहेत.

या विश्वचषकातील इतर संघापेक्षा नेदरलॅंड्सचे आक्रमण उत्कृष्ठ आहे. तसेच त्यांनी 136वेळा पेनल्टी सर्कलमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे भारतीय संघाचा गोलकिपर पीआर श्रीजेशला त्याचे हल्ले रोखण्याचे अधिक कष्ट करावे लागणार आहे. तर भारताच्या बचावफळीलाही आजच्या सामन्यात त्यांची कामगिरी उंचावण्याची गरज आहे. बेल्जियम विरुद्धचा सामना अटीतटीचा झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता.

त्याचबरोबर नेदरलॅंड्सने आत्तापर्यंत 1973, 1990 आणि 1998 असे तीन वेळी हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच 2014 चा विश्वचषकाचे यजमानपदही भुषवताना त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्यांना 2014 च्या हॉकी विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध अंतिम सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

तर भारत 1975चा विश्वचषक विजेता ठरला होता. 1971ला झालेल्या पहिल्या विश्वचषकात ते कांस्यपदकाचे आणि 1973ला रौप्यपदकाचे मानकरी ठरले आहेत. मात्र त्यानंतर भारतीय संघाची कामगिरी ढासळली. 2014च्या विश्वचषकात ते सहाव्या स्थानावर राहीले होते.

दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. यामुळे आजच्या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष असणार आहे. आजचा सामना जो संघ जिंकेल तो तीन वेळेचा विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी उपांत्य सामन्यात भिडणार आहे. हा सामना 15 डिसेंबरला होणार आहे.

आमने-सामने:

भारत आणि नेदरलॅंड्स या संघात 2013पासून 9 सामने झाले आहेत. यातील प्रत्येकी चार विजय दोन्ही संघांच्या नावावर आहे. एक सामना अनिर्णीत राहिला.

विश्वचषकात हे दोन संघ सहा वेळा आमने-सामने आले आहेत. या सहाही सामन्यात नेदरलॅंड्सच विजयी ठरला आहे. यामुळे आजच्या सामन्यातही नेदरलॅंड्स भारताविरुद्ध त्यांचा विजयाचा इतिहास कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

नेदरलॅंड्सचा भारताविरुद्ध गोल करण्याचा फॉर्म उत्तम आहे. त्यांनी आतापर्यत एकूण 15 सामन्यात 46 गोल केले आहेत.

तसेच 1928च्या ऑलिंपिकमध्ये भारताने नेदरलॅंड्सला 3-0 असे पराभूत करत सुवर्णपदकाची कमाई केली होती.

आज होणाऱ्या नेदरलँड्स विरुद्ध जर्मनी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क, दूरदर्शनवर आणि एफआयएचच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर होणार आहे.

असे आहेत संघ,

भारत: मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेसना सिंग कंगुजाम, कृष्णा बहादूर पाठक (गोलकिपर), हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरूण कुमार, कोथाजीत सिंग खंडागबम, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, निलकांता शर्मा, हार्दीक सिंग, सुमित, आकाशदिप सिंग, मनदिप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजीत सिंग, पीआर श्रीजेश (गोलकिपर).

नेदरलँड्सचा: बार्ट सँडर, बेकर बिली (कर्णधार), बल्क लार्स, ब्लॅक पिरमिन(गोलकीपर), प्रृईजर मिक्रो, ब्रिंकमन थिएरी, जेरोइन हर्ट्झबेगर, क्रुन जोरीट, द गेउस जोनास, द वूग्द बॉब, केम्परमन रॉबर्ट, शुरमन ग्लेन, वॅन एस सेव, वॅन दम थेज, वॅन देर वेन सॅम (गोलकीपर), वॅन देर विर्डेन मिंक, वेर्गा वॅलेंटाइन.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: रियो ऑलिंपिक विजेता अर्जेंटिना स्पर्धेबाहेर, इंग्लंड उपांत्यफेरीत दाखल

कर्णधार कोहलीला पर्थची हिरवी खेळपट्टी पाहून टेन्शन ऐवजी झाला आनंद…

एमएस धोनीवर सुनील गावसकर पाठोपाठ या दिग्गज क्रिकेटपटूचाही हल्लाबोल