हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड पाठोपाठ चीनने आयर्लंडलाही रोखले बरोबरीत

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज झालेल्या (4डिसेंबर) चीन विरुद्ध आयर्लंड हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात चीनच्या गुवो जीन आणि आयर्लंडच्या साऊथर्न अॅलन या दोघांनी प्रत्येकी एक गोल केला.

विश्वचषकात प्रथमच खेळणाऱ्या चीनने इंग्लंड विरुद्धचा फॉर्म कायम ठेवत आयर्लंडलाही उत्तम टक्कर दिली. त्यांचा या विश्वचषकातील हा दुसरा अनिर्णीत सामना ठरला. पहिल्या सामन्यांत त्यांनी इंग्लंडला 2-2 असे बरोबरीत रोखले होते. तर आयर्लंड हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना 2-1 असा हरला आहे.

दोन्ही संघाना हा विजय मिळवणे आवश्यक असल्याने त्यांनी सावध सुरूवात केली. पहिल्या सत्रात आयर्लंडच्या खेळाडूंनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. यावेळी मॅगी युजीनची गोल करण्याची संधी थोडक्यात मुकली. दुसऱ्या सत्रातच आयर्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाली. मात्र ओ डोनोग्यु शेनचा गोल रोखण्यात गोलकिपर वांग कॅयुला यश आले.

31व्या मिनिटाला चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र आयर्लंडचा कर्णधार आणि गोलकिपर हार्टे डेव्हिडने चीनचा तो ड्रॅग फ्लिकर शॉट अडवत चीनला आघाडी घेण्यापासून रोखले. मात्र 43व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल करत चीनने 1-0 अशी आघाडी मिळवली. द्यू तलाकेच्या पासवर जीनने हा गोल केला.

एक मिनिटाच्या फरकाने आयर्लंडने गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. रॉबसन मिशेलच्या रिव्हर्स पासवर अॅलनने पेनल्टी स्पॉटवरून हा महत्त्वाचा गोल केला.

शेवटच्या निर्णायक आणि चौथ्या सत्रात दोन्ही संघाने आक्रमक खेळाला सुरूवात केली. यावेळी चीनला परत एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाली. पण डेव्हिडने अप्रतिम कामगिरी करत तो गोल रोखत चीनचे सामना जिंकण्याचे स्वप्नही भंग केले.

तसेच या दोन्ही संघाना त्यांच्या पुढील सामन्यात विजय आवश्यक असून त्यांचे सामने 7 डिसेंबरला होणार आहेत. यामध्ये चीन विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा पहिला तर आयर्लंड विरुद्ध इंग्लंड हा दुसरा सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

ISL 2018:जमशेदपूरशी बरोबरीमुळे ब्लास्टर्सच्या आशांना आणखी धक्का

हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंडची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने केली सहज मात

२०११ विश्वचषकाचा हिरो गौतम गंभीरची क्रिकेटमधून निवृत्ती