हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या

भुवनेश्वर। भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात पाकिस्तान संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना रविवारी (9 डिसेंबर)नेदरलॅंड विरुद्ध होणार आहे.

मागील झालेल्या दोन सामन्यात पाकिस्तानला जर्मनी विरुद्ध 1-0 असा पराभव आणि मलेशिया विरुद्ध 1-1 असे बरोबरीवर समाधान मानावे लागले.

यामुळे चार वेळेच्या विश्वविजेत्या पाकिस्तान संघासाठी नेदरलॅंड विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्याआधीच त्यांचा डिफेंडर अमाद बट याच्यावर हा सामना खेळण्याची बंदी आणली आहे. यामुळे पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

बटवर मलेशिया विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे (एफआयएच) नियम तोडल्याचा आरोप आहे. त्याच्यावर विरोधी संघातील खेळाडूला मुद्दाम स्पर्श करून सामन्यात अडथळा आणल्याचा आरोप आहे. मात्र पाकिस्तानचे मॅनेजर आणि माजी विश्वविजते हसन सरदार यांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सरदार यांनी या आरोपाचा निकाल लावणाऱ्या स्पर्धेच्या तांत्रिक प्रतिनिधी ख्रिस्टन डेकेनब्रोकवर चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी बटच्या आरोपासंदर्भात एफआयएचकडे अपिलपत्रही सादर केले आहे.

“हा निर्णय डचच्या तांत्रिक प्रतिनिधीने घेतला आहे. नेदरलॅंड विरुद्धचा सामना आमच्यासाठी अतिमहत्त्वाचा असल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे”, असे आरोप सरदार यांनी डेकेनब्रोकवर लावले आहेत.

सरदार यांचे आरोप खोटे आहेत. डेकेनब्रोक हे डच नसून जर्मन आहे हे एफआयएचच्या वेबसाईटवरून स्पष्ट झाले आहे.

सरदार यांचे आरोप जरी चुकीचे असले तरी त्यांनी सादर केलेल्या अपीलचा विचार एफआयएच करणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय शनिवारी घेतला जाणार आहे.

तसेच पाकिस्तानचे माजी आणि सध्याचे मलेशिया संघाचे प्रशिक्षक रोलन ओल्टमन्स यांच्या मते, मलेशियन अधिकाऱ्यांनी बटवर लावलेले आरोप किती बरोबर आहे की ते चूक हे सांगता येत नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: चिवट चीनसमोर गतविजत्या ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

आॅस्ट्रेलियाच्या कर्णधाराची विकेट घेत इशांत शर्माने केला मोठा पराक्रम

हॉकी विश्वचषक २०१८: २८ वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणाऱ्या फ्रान्सचा बलाढ्य अर्जेंटिनावर धक्कादायक विजय