हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकातील नवव्या सामन्यात कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टूली कोबीलेने आणि कॅनडाच्या टपर स्कॉटने गोल केला.

हे दोन्ही संघ त्यांच्या पहिल्या सामन्यांत पराभूत झाले होते. यामुळे आज ते विजय मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरले होते. मात्र दोघांनाही बरोबरीत समाधान मानावे लागले.

जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असणाऱ्या कॅनडा संघाने पहिल्या सामन्याप्रमाणे खेळाला सुरूवात केली. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला चांगलीच टक्कर दिली.

सुरूवातीलाच दोन्ही संघात बरोबरीचा खेळ झाला तर एकमेकांची बचाव फळी त्यांना तोडण्यात अपयश येत होते. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा मिआ मोहम्मद आणि कॅनडाचा जोन्सटन गोर्डन यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्यासाठी धडपड सुरू होती.

पहिल्या दोन सत्रात दक्षिण आफ्रिकेला 2 पेनल्टी कॉर्नर मिळाल्या. यावेळी कॅनडाचा गोलकिपर कार्टर डेव्हिड ते उत्तमरीत्या अडवत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले.

पहिल्या 30 मिनिटांत एकही गोल न झाल्याने सामना 0-0 असा होता. तिसऱ्या सत्राला कॅनडाने आक्रमक सुरूवात केली. त्यांच्याकडून किर्कपॅटिक जेम्सचा गोल थोडक्यात मुकला.

दक्षिण आफ्रिकेच्या कोबीलेला शेवटी कॅनडाची बचाव फळी मोडण्यात यश आले. त्याने 43व्या मिनिटाला या सामन्यातील पहिला गोल नोंदवला. 1-0 अशी आघाडी मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खूष होते . मात्र कॅनडाच्या स्कॉटने त्यांच्या आनंदावर विरजण घालत सामना 1-1 असा बरोबरीत केला. त्याने तिसरे सत्र संपण्यास काही सेंकद बाकी असताना पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला.

चौथे निर्णायक सत्र हे पण अटीतटीचे झाले. यामध्येही एकही गोल न झाल्याने सामना बरोबरीत सुटला. यामुळे कॅनडा क गटाच्या गुणतालिकेत तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या स्थानावर आहे.

या सामन्यात दोन्ही संघांनी समतोल खेळ केला. तसेच कॅनडाचा गोलकिपर कार्टर डेव्हिड हा सामनावीर ठरला.

या दोन्ही संघाचे पुढील सामने 8 डिसेंबरला होणार असून  कॅनडा विरुद्ध भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध बेल्जियम असे सामने रंगणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

किंग कोहलीचा निर्धार पक्का, मालिका जिंकणारच

तो खास पराक्रम करण्यासाठी बांगलादेशला खेळावे लागले तब्बल ११२ कसोटी सामने

हॉकी विश्वचषक २०१८: पाॅकेटमनी खर्च करुन तो संघ आलाय भारतात