हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड विरुद्धच्या पराभवाने आयर्लंड स्पर्धेतून बाहेर

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या १४व्या हॉकी विश्वचषकात आज (७डिसेंबर) इंग्लंडने आयर्लंडला ४-२ असे पराभूत केले. तसेच या पराभवामुळे आयर्लंड या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

ब गटामधील गुणतालिकेत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर राहिला असून त्यांचा बाद फेरीचा सामना सोमवारी (१० डिसेंबर) न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.

दोन्ही संघाना हा विजय आवश्यक असल्याने ते आक्रमक खेळ करत होते. पहिल्या सत्रात कॅलनन विलच्या पासवर कोंडोन डेव्हिडने गोल करत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या सत्रात एकही गोल झाला नाही.

तिसऱ्या सत्रात चार मिनिटांमध्ये तीन गोल झाले.३५व्या मिनिटाला क्रिस कार्गोने गोल केला मात्र अन्सेल लियामने दोन मिनिटांच्या फरकाने इंग्लंडकडून दुसरा गोल करत इंग्लंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या काही सेकंदानंतरच ओ डोनोग्यु शेनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामना सामना २-२ असा बरोबरीत आणला. तर गॉल जेम्सने ३८व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला ३-२ असे आघाडीवर नेले.

चौथ्या सत्रात आयर्लंडने सामना बरोबरीचा करण्याचा प्रयत्न करताना कार्गोला गोल करण्याची संधी मिळाली. पण जॉर्ज पिनेरने तो पेनल्टी कॉर्नर रोखला. तर सामना संपण्यास काही सेकंद बाकी असतानाच ग्लेगोर्ने मार्कने मिळालेल्या संधीचा फायदा घेत इंग्लंकडून गोलचा चौकार पूर्ण केला.

या विजयामुळे इंग्लंड ब गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर आज चीनला ११-० असे पराभूत करणारा गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

हॉकी विश्वचषक २०१८: ऑस्ट्रेलियाचा चीन विरुद्ध एकतर्फी विजय

ISL 2018: मार्सेलिनीयोच्या गोलमुळे पुण्याचा ब्लास्टर्सला धक्का

ड्वेन ब्रावोच्या या अंदाजामुळे कोहलीच्या टीम इंडियाचे टेन्शन वाढले