HWL 2017: भारताचा आज साखळी सामन्यातील शेवटचा सामना जर्मनीविरुद्ध

भुवनेश्वर । सध्या सुरु असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये भारताचा आजचा सामना जर्मनी विरुद्ध होणार आहे. हा सामना ओडिशामधील भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणार आहे.

भारताची या मागील कामगिरी साजेशी अशी नव्हती. त्यामुळे रविवारी जेव्हा इतर संघानी सराव सत्र रद्द केले तेव्हा भारताचे प्रशिक्षक सॉरर्ड मारीजने या सत्राचा उपयोग जर्मनी विरुद्ध होणाऱ्या सामन्यात संघाचे मनोबल उंचाविण्यासाठी केला. तसेच या सत्राचा उद्देश चुकांपासुन दूर राहणे हा ही होता आणि खेळाडूंनी तसा प्रयत्नही केला.

भारताने या मागील सामन्यात जिंकण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात भारताने १-१ अशी बरोबरी केली. तर इंग्लड विरुद्ध भारताला २-३ अश्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

आजचा हा सामना एकप्रकारे ब गटातील अव्वल संघ असणाऱ्या जर्मनी विरुद्ध गटात तळात असणाऱ्या भारताविरुद्ध होणार आहे. साखळी लढती ह्या केवळ कोण कुणाविरुद्ध खेळणार हे ठरवण्यासाठी असल्या तरी भारतीय संघाला आज टीकाकारांना उत्तर द्यावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ ६व्या स्थानी असून जर्मनी ५व्या स्थानी आहे.

आज हा सामना ७ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे.