हाँग काँग ओपन: सौरभ वर्मा आणि पी. कश्यप पहिल्याच फेरीत पराभूत

जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानी असणारा पारुपल्ली कश्यप आणि ५८ व्या स्थानी असणारा सौरभ वर्मा हे दोन्हीही भारतीय बॅडमिंटनपटू सध्या सुरु असलेल्या हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाले.

कश्यपने कालच पात्रता फेरीतील दोनही सामने जिंकून मुख्य स्पर्धेत प्रवेश केला होता. त्याचा आजचा सामना कोरियाच्या ली डाँग केउनशी झाला. १ तास ९ मिनिटे चाललेली ही लढत चांगलीच रंगतदार झाली.

सामन्यातील पहिल्या सेटमध्ये कश्यपने २१-१५ असा विजय मिळवत आघाडी घेतली होती परंतु दुसऱ्या सेटमध्ये ली डाँग केउनने पुनरागमन करत कश्यपाला एकही संधी न देता सेट २१-९ असा जिंकला आणि सामन्यात बरोबरी साधली. तिसरा सेट अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला परंतु ली डाँग केउनने अखेर कश्यपवर २०-२२ अश्या फरकाने विजय मिळवत सामनाही जिंकला.

त्याचबरोबर या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत सौरभ वर्माचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोशी झाला. या सामन्यात सुगियार्तोने सौरभवर २१-१५,२१-८ अश्या फरकाने सरळ सेटमध्ये सहज विजय मिळवला.