आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत नमिश हुड, रित्सा कोंदकर, तेज ओक, प्रिशा शिंदे यांना विजेतेपद

पुणे । पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज २०१८ स्पर्धेत नमिश हुड, रित्सा कोंदकर, तेज ओक व प्रिशा शिंदे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत विजेतेपदाच्या लढतीत ८ वर्षाखालील मुलांच्या गटात नमिश हुडने आर्यन किर्तनेचा 7-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

7 वर्षीय नमिश आर.एन.डी सोसायटी येथे अविनाश हुड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. डी.ए.व्ही पब्लिक स्कुल येथे दुस-या इयत्तेत शिकत असून, या वर्षातील त्याचे हे या गटातील दुसरे विजेतेपद आहे. मुलींच्या गटात रित्सा कोंदकरने आरोही देशमुखचा 7-3 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. 7 वर्षीय रित्सा संस्कृती स्कुल येथे दुस-या इयत्तेत शिकत असून विनिंग एज टेनिस अकादमी येथे मंदार कापशीकर यांच्या मार्गदर्शनाखेली सराव करते.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुखापतीमुळे अमोघ दामलेने अंतिम सामन्यामधुन माघार घेतली. तेज ओक विजेता ठरला. 10 वर्षीय तेज सिंबायोसीस स्कुल येथे पाचव्या इयत्तेत शिकत असून या गटीतील या वर्षातील त्याचे हे तीसरे विजेतेपद आहे. तेज एपीएमटीए येथे केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात प्रिशा शिंदेने मेहेक कपुरचा 7-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकॉन ग्रुपच्या नेहा ताम्हाणे, नमिता टेपण व पराग टेपण यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी

८ वर्षाखालील मुले
नमिश हुड वि.वि आर्यन किर्तने 7-3

८ वर्षाखालील मुली
रित्सा कोंदकर वि.वि आरोही देशमुख 7-3

10 वर्षाखालील मुले
तेज ओक वि.वि अमोघ दामले (सामना सोडला)

10 वर्षाखालील मुली
प्रिशा शिंदे वि.वि मेहेक कपुर 7-5