लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते

क्रिकेट इतिहासात इंग्लंडमधील लॉर्ड्स मैदानाला विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या मैदानावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटते की या लॉर्ड्सच्या पॅव्हेलियनमध्ये असणाऱ्या ओनररी बोर्डवर (सन्मान यादी) आपले नाव असावे.

पण या बोर्डवर एखाद्या खेळाडूचे नाव कोरले जाण्यासाठी त्याला या मैदानावर खास कामगिरी करावी लागते.

एखाद्या खेळाडूने या मैदानावर शतक किंवा सामन्याच्या एका डावात 5 विकेट्स तर सामन्यात 10 विकेट्स घेतल्या तर त्याचे नाव या बोर्डवर कोरले जाते.

हे बोर्ड यजमान इंग्लंडच्या आणि पाहुण्या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये लावलेले आहेत, जेणेकरुन खेळाडूंना लॉर्ड्स मैदानाच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजी आणि गोलंदाजीची कामगिरी समजेल.

यजमान इंग्लंडच्या ड्रेसिंग रुममध्ये असणाऱ्या बोर्डवर जॅक हॉब्स आणि लेस अमी यांसारख्या फलंदाजांची तर फ्रेड ट्रूमॅन आणि डेरेक अंडरवूड यांसारख्या गोलंदाजांची नावे आहेत.

तर अष्टपैलूंमध्ये गबी अॅलेन, इयान बॉथम आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ यांसारख्या खेळाडूंची नावे फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही बॉर्डवर दिसतात.

याबरोबरच पाहुण्या संघाच्या ड्रेसिंगरुममध्ये विक्टर ट्रम्पर, सर विवियन रिचर्ड्स या फलंदाजांप्रमाणे बिशनसिंग बेदी, वकार युनुस अशा गोलंदाजांची नावे कोरलेली आहेत. तसेच गॅरी सोबर्स, केथ मिलर यांसारखे महान अष्टपैलू खेळाडूंचीही या ओनररी बोर्ड्सवर नावे आहेत.

या बोर्ड्सवर सर्वाधिक 9 वेळा इंग्लंडचे दिग्गज अष्टपैलू खेळाडू सर इयान बॉथम यांचे नाव आहे. 8 वेळा त्यांचे नाव गोलंदाजांच्या यादीत तर एकदा शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे.

गोलंदाजांच्या बोर्डवर 2 वेळा 10 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या तर 6 वेळा 5 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आहे.

सध्या खेळत असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंपैकी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा यांची नावे या बोर्डवर आहेत.

त्याचबरोबर काही महान खेळाडूंना या बोर्डवर नाव न कोरता आल्यानेही हा ओनररी बोर्ड प्रसिद्ध आहे. यात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, शेन वॉर्नसारखे खेळाडू आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पहिल्या ६ षटकांतच भारताला दोन मोठे धक्के

दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन मोठे बदल

फोटो अल्बम- लाॅर्ड्स कसोटीला सचिनसह भारतातील विविध क्षेत्रातील ३ दिग्गजांची हजेरी