रोहित, विराट, धोनी यांना आयपीएलमध्ये किती कोटी?

आयपीएल २०१८ चे लिलाव बंगळुरूमध्ये पार पडला. या लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने १२.५० कोटींमध्ये खरेदी केले. पण आयपीएलच्या या ११ व्या मोसमात सर्वाधिक किंमत मिळाली ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीला.

या मोसमासाठी आयपीएल संघांना त्यांचे लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकणार होते. यात लिलावापूर्वी जास्तीतजास्त ३ खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार होते.

त्यानुसार एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या अशा मोठ्या खेळाडूंना त्यांच्या संघाने कायम केले होते.

४ जानेवारीला मुंबईत आयपीएल संघांना त्यांचे कोणते खेळाडू संघात कायम राहणार आहेत त्यांची नावे हे जाहीर करण्याचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अनेक फ्रॅन्चायझींनी तीनही खेळाडूंची नावे जाहीर केली होती. तसेच काहींनी २ तर काहींनी त्यांच्या एकाच खेळाडूला कायम केले होते. याबरोबरच या खेळाडूंना किती रक्कम देता येणार याचा नियमही होता. त्यानुसार या खेळाडूंना ती रक्कमही फ्रॅन्चायझींनी घोषित केली होती.

संघात कायम केलेल्या खेळाडूंना किती रक्कम देता येणार याचे काही नियम:
– खेळाडूंना संघात कायम ठेवताना जर ते तीन खेळाडू कॅप खेळाडू असतील तर त्यातील पहिल्या खेळाडूला १५ कोटी, दुसऱ्याला ११ कोटी आणि तिसऱ्याला ७ कोटी पेक्षा जास्त रुपये मोजता येणार नाहीत.
– जर दोन कॅप खेळाडू कायम ठेवायचे असतील तर पहिल्या खेळाडूला १२.५ कोटी आणि दुसऱ्याला ८.५ कोटीपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही.
– संघाला एकाच खेळाडूला जर कायम करायचे असेल तर १२.५ कोटी खर्च करता येतील.

काय आहे कॅप खेळाडू आणि अनकॅप खेळाडू यांच्यातील फरक:

# कॅप खेळाडू म्हणजे ज्यांनी एक तरी आंतराष्ट्रीय सामना खेळला असेल.

# अनकॅप खेळाडू म्हणजे ज्यांना फक्त देशांतर्गत क्रिकेटचा अनुभव आहे किंवा काहीवेळेस तोही अनुभव नसलेला खेळाडू.

आयपीएल संघांनी कायम केलेल्या या खेळाडूंना मिळाली ही रक्कम:

चेन्नई सुपर किंग्स :
एम एस धोनी (१५ कोटी)
सुरेश रैना (११ कोटी)
रवींद्र जडेजा (७ कोटी)

मुंबई इंडियन्स :
रोहित शर्मा (१५ कोटी)
हार्दिक पंड्या (११ कोटी)
जसप्रीत बुमराह(७ कोटी)

सनरायझर्स हैद्राबाद :
डेव्हिड वॉर्नर (१२ कोटी)
भुवनेश्वर कुमार (८.५ कोटी)

राजस्थान रॉयल्स :
स्टीव्ह स्मिथ (१२ कोटी)

किंग्स इलेव्हन पंजाब:
अक्षर पटेल (६.५ कोटी)

कोलकाता नाईट रायडर्स :
सुनील नारायण (८.५ कोटी)
आंद्रे रसेल (७ कोटी)

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर:
विराट कोहली (१७ कोटी)
एबी डिव्हिलियर्स (११ कोटी)
सर्फराज खान (१.७५ कोटी)

दिल्ली डेअरडेव्हिल्स :
रिषभ पंत (८ कोटी)
ख्रिस मॉरिस (७.१ कोटी)
श्रेयश अय्यर (७ कोटी)