आयपीएल उदघाटन सोहळ्यात रणवीर सिंग ऐवजी हा अभिनेता करणार परफॉर्म!

आयपीएलचा ११ वा मोसम दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे सर्वांनाच आयपीएलचे वेध लागले आहेत. ७ एप्रिलला आयपीएल २०१८ चा पहिला सामना होणार आहे. या सामन्याआधी आयपीएलचा उदघाटन सोहळा पार पडेल.

या उदघाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग अंतिम परफॉर्मन्स करणार होता पण त्याला झोया अख्तरच्या गली बॉयच्या शूटच्यावेळी खांद्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याने आयपीएलच्या उदघाटन सोहळ्यातून माघार घेतली आहे.

त्याच्याऐवजी आता बॉलीवूड स्टार हृतिक रोशन परफॉर्म करणार आहे. या बद्दल हृतिकने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ” आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात मी परफॉर्म करणार आहे. याबद्दल मी अधिकृतरित्या निश्चित केले आहे. मी यासाठीचा सराव सुरु केला आहे. प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा लाईव्ह परफॉर्म करणे मजेदार असेल.”

हृतिक आयपीएल उदघाटन सोहळ्यात अंतिम परफॉर्मन्स करणार आहे. तसेच तो त्याच्याच हिट झालेल्या गाण्यांवर डान्स करेल. या गाण्यांमध्ये धूम मचाले, एक पल का जीना, बावरे बावरे आणि सॅनॉरीटा यांचा समावेश आहे.

त्याबरोबरच बॉलीवूड अभिनेता वरूण धवन, परिणीती चोप्रा आणि जॅकलिन फर्नांडिस हे देखील आयपीएलच्या उदघाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहेत. हा उदघाटन सोहळा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडेवर होणाऱ्या सलामीच्या सामन्यापुर्वी होणार आहे.