हुंदळेवाडीचा वाघ… सिद्धार्थ देसाई

-महेश बसापुरे (Twitter- @MaheshBassapure)
एका गल्लीचं हुंदळेवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम अशा चंदगड तालुक्यातील छोटस गाव. गावात शिरताच रस्त्याच्या एका कडेला भाताचं शेत तर दुसऱ्या बाजूला ऊस लावलेला. जेमतेम पन्नास घर असतील त्या गावात.

‘हुंदळेवाडीचा वाघ…’ प्रो कबड्डीसाठी यु मुंबाकडून निवड झाल्याबद्दल पाठ्यच अभिनंदन करण्यासाठी ग्रामस्थांनी लावलेला हा भर चौकातला फलक गावात गेल्यागेल्या नजरेस पडला. मग पुढे सिध्दार्थचं घर शोधत शोधत गावाच्या टोकाला पोहचलो तेच एकानं म्हंटल, ‘अहो आमचा सिद्धू हितचं र्हाताय’. लगोलग घरातंन आवाज आला, ‘यवा की, बसा… सिद्धू चे पप्पा यतीलचं आतं वावरातनं’ सिध्दार्थच्या आईनं घरात बसवलं आणि परड्यात म्हसरांची व्यवस्था करायला निघून गेली.

घर नुसता ट्रॉफी आणि मेडलनी भरलेलं. मग ते सगळं बघायला लागलो तर अजून एक नवीनच गोष्ट लक्षात आली, यात सिध्दार्थच्या बरोबर त्याचा मोठा भाऊ सूरजच्या नावाच्या पण अनेक ट्रोफी, मेडल तिथे होते. मग थोड्याच वेळात बाहेरून गाडीचा आवाज आला, तर समोर हाफ चड्डी, वर मळका शर्ट, नमस्कार मी शिरीष देसाई सिद्धूचा पप्पा. स्पेनडरवर भला मोठा गवताचा भारा घेऊन ते आले होते. त्या गाडीवर एम.के.एल लिहिलेलं.

ते गाडीवरून उतरताच म्हणाले, ही गाडीबी कबड्डीत जिकले माझ्या पोरांनी. बोलता बोलता भारा टाकून लगेच कपडे बदलून आले. ते दोन्ही पोरांबद्दल भरभरून बोलू लागले. त्यांना विचारायच्या आधीच त्यांनी सिद्धूचा शाळेपासून ते प्रो कबड्डीपर्यंतचा प्रवास उत्साहाने सांगितला. तेवढ्यात सिध्दार्थची आई चहा पोहे घेऊन आली. तीनं कपटातली एक फाईल बाहेर काढली, त्यात दोघांच्या आतातपर्यंत कबड्डीत जिंकल्यानंतर आलेल्या बातम्यांची कात्रण माऊलीने जपून ठेवली होती. एक एक करून प्रत्येक सामन्याची हकीकत सांगू लागली.

शिरीष म्हणाले, ‘चंदगडच्या लाल मातीतला हा रांगडा गडी स्वभावाला नरम असला तरी त्याच्या खेळात करंट हाय, त्याच्या रक्तातच कबड्डी हाय. त्याचा थोरला भाऊ सुरजनं तर राष्ट्रीय कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलंय. नशिबानं दोनयेळेस हुलकावणी दिल्यानं जर पोर नाराज झालंय. मात्र, सिध्दार्थनं मिळालेल्या संधीच सोन करुन दाखवलं.’ आपल्या मोठ्या भावाचं स्वप्न सिद्धून सत्यात उतरवल्याचा आनंद त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, पण सूरजला संधी न मिळाल्याची सलही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

‘पठ्यानं पहिल्याच संधीच सोन करत प्रो कबड्डी लीगमध्ये केवळ चार सामन्यात बळींच अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे सिद्धार्थ देशाच्या कानाकोऱ्यात पोहचला. गावाबरोबर तालुक्याचं नाव त्यानं देशपातळीवर नेलं. परिस्थितीमूळ या भागातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी मिळत नाही, त्यामुळे सिध्दार्थच हे यश या लाल मातीतल्या रांगड्या खेळाडूंना नक्कीच रोत्साहान देईल यात शंका नाही.’ अस भावुक होऊन त्याचे शाळेतील प्रशिक्षक पांडुरंग मुणगेकर सर सांगतात.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या भावंडाना घरातूनच प्रोत्साहन मिळालं. वडिलांना त्यांच्या उमेदीच्या काळात हवं ते पाठबळ मिळालं नाही. त्यामुळे प्रतिभा असूनही त्यांना कबड्डी जगण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळचे गोव्याचे कबड्डी चॅम्पियन वैजू पाटील सारख्या खेळाडूला त्यांनी टक्कर दिली होती. मात्र, पुढे घरची शेती, जनावरांची जबाबदारी उचलण्यात आवड आणि निवड यात स्वातंत्र्य मिळालच नाही. मग आपलं स्वप्न त्यांनी आपल्या मुलांच्या रूपानं सत्यात उतरवलं. थोरला मुलगा सुरज हा लहानपणापासूनच कबड्डीच्या तरबेज. तलवार चालावी तशी त्याची चढाई, त्यात घर आणि शाळेतून योग्य मार्गदर्शन मिळाल्यानं त्यानं अगदी लहान वयातच कबड्डीमध्ये आपली चमक दाखवून दिली. त्याच्याच जोरावर त्याची सैन्यात निवड झाली.

तर सिद्धार्थ हा लहानपणापासूनच शेतात रमणारा, लाजरा होता. आपल्या थोरल्या भावाचं बघून बघूनच त्याला कबड्डीच वेड लागलं. शाळेतील नव्वद टक्केवाला मुलगा असूनही घरच्यांनी कधी त्याला कबड्डी सोडायला भाग नाही पडलं. त्याची आवड जप्त त्यानं शाळा, कॉलेज आणि मग व्यावसायिक कबड्डीत यश मिळवलं. पुण्यात तेजस बाणेर संघाकडून खेळत असताना त्यांच्या खेळाच्या जोरावर तो एअर इंडिया संघासाठी निवडला गेला. तिथून मग त्याची यशाची गाडी सुसाट सुटली. ती आज प्रो कबड्डी मध्ये देखील आपली कमाल दाखवत आहे.

सिध्दार्थचा असा सगळा चढता आलेख असला तरी त्याचे वडील आणि आई यांचा साधेपणा त्यांच्यातही दिसून येतो. मैदानातही तो त्याच संयमाने वावरताना दिसतो. सध्या प्रो कबड्डी सुरू असूनही त्याच्या आई – वडील अजूनही एकही सामन्याला हजर राहू शकले नाहीत. घरी दोघंच, चार जनावर, भात कंपनी तोंडावर आलेली अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या लेकाचा खेल बघण्याची इच्छा असूनही त्यांना जाता येत नाही. मात्र, सामना असला की मैदानापेक्षा जास्त गर्दी त्यांच्या घरी टीव्ही समोर होते. तो ही टीव्ही कबड्डीच बक्षीसच. एवढंच नाही तर शेतातुन गवताचा भारा आणण्यासाठी वापरण्यात येणारी स्प्लेडर गाडी देखील महाराष्ट्र कबड्डी लीगमध्ये मिळालेली आहे. या सगळ्याच या दोघांना इतकं कौतुक आहे की ते घरी अक्षरशः कबड्डी जगतात. आजही त्याचे वडील कोणताही डाव सांगताना त्याच प्रात्यक्षिक करून दाखवतात. त्यांच्या त्या वागण्यात, बोलण्यात तो उत्साह स्पष्ट दिसून येतो.

प्रो-कबड्डीच्या सहाव्या हंगामात मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने इतिहास रचला आहे. हा त्याचा यू मुंबा संघाकडून पहिलाच हंगाम असून फक्त चार सामन्यांमध्ये सिद्धार्थने बळींचे अर्धशतक पूर्ण केले आहे. आतापर्यंत सिद्धार्थने दोनदा ‘सुपर रेड’ तर तीन सामन्यांमध्ये त्याने 10 पेक्षा जास्त गुणांची कमाई करत प्रो कबड्डीमध्ये नवा अध्याय लिहिला आहे. आतापर्यंत अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन नावाजलेल्या खेळाडूंच्या नावावर हा विक्रम होता. या दोन्ही खेळाडूंनी पाच सामन्यांमध्ये बळींचे शतक पूर्ण केले होते. पण सिद्धार्थने मात्र फक्त चार सामन्यांमध्येच हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना सिद्धार्थने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. यू मुंबाने 34 लाखांची बोली लावत सिद्धार्थला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले होते. अनुप कुमारच्या नसण्याने यू मुंबा संघात निर्माण झालेली पोकळी महाराष्ट्राचा सिद्धार्थ देसाई भरून काढत आहे. लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने चार सामन्यांत 51 गुणांची कमाई केली आहे. कामगिरीत सातत्य राखून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा त्याचा निर्धार आहे.

त्याचे वडील पंचक्रोशीतले नावाजलेले कबड्डीपटू तर सुरज देसाई हा सैन्य दलाकडून कबड्डी खेळतो. 2014 मध्ये त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली. त्यानंतर त्याला 2016 मध्ये जयपूर पिंक पँथर संघाने प्रो कबड्डीसाठी आपल्या संघात घेतलं, मात्र सैन्यदलकडून परवानगी न मिळाल्याने त्यावेळी त्याची पहिल्यांदा संधी हुकली. त्यानंतर मागील हंगामात त्याला दबंग दिल्ली संघानं संधी दिली. यावेळी सरवादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाल्यानं पुन्हा एकदा त्याला नशिबानं हुलकावणी दिली. त्यादरम्यान त्याचा धाकटा भाऊ सिद्धार्थ यान एअर इंडिया संघाकडून खेळताना चमकदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र कबड्डी संघात स्थान पटकावलं. तेथील कामगिरीवर त्याला यु मुंबा संघानं या हंगामात खेळण्याची संधी दिली.

– सलणारी गोष्ट
या अशा आनंदी वातावरणात सिद्धार्थ च्या आई आणि वडिलांच्या डोळ्यात सूरज या स्पर्धेत खेळू शकला नाही याची बोचरी सल मात्र दिसून येते. या दोन्ही भावंडाना एकत्र प्रो कबड्डी खेळताना बघायचं त्यांचं स्वप्न आहे. सिद्धार्थसोबतच सुरजही तितकाच या स्पर्धेसाठीचा दावेदार आहे. त्याला याहीवेळी नशिबानं साथ नाही दिली. मात्र त्यानं आपलं सगळं पाठबळ सिद्धूच्या मागे लावेलं. आजही प्रत्येक सामन्याच्या वेळी त्याच मार्गदर्शन मिळत असत. दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास आहे. या सगळ्यात दोन्ही मूल आपलं स्वप्न जगतयात याच समाधान यावेळी शिरीष देसाई यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

कॅप्टन कूल अनुप कुमार करणार प्रो कबड्डीला अलविदा?

पोस्टर बॉय राहुल चौधरीचा प्रो कबड्डीमध्ये भीमपराक्रम

प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात श्रीकांत जाधवचा या विक्रमाच्या यादीत समावेश