तर युवराज सिंगच्या निवृत्तीची वेळ ठरली

मुंबई । युवराज सिंगने निवृत्ती बद्दल खुलासा करताना आपल्यात अजूनही काही वर्ष क्रिकेट बाकी असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच आपण अजूनही २ ते ३ आयपीएल खेळणार असल्याचं सांगितलं आहे.

जून महिन्यापासून संघाबाहेर असलेला युवराज भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी इच्छुक आहे. त्याच्या मते अजूनही २ वर्षांचं क्रिकेट त्याच्यात कमीतकमी बाकी आहे.

स्पोर्ट्सस्टार लाईव्हशी बोलताना युवराजने ‘निवृत्ती कधी घेणार?’ या प्रश्नावर आपल्यात अजूनही क्रिकेट बाकी असल्याचं वक्तव्य केलं. ” मला क्रिकेटमधून आनंदाने निवृत्त व्हायचे आहे. मला तेव्हाच निवृत्त व्हायला आवडेल जेव्हा मला वाटेल की सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. आणि मला मी केलेल्या कामगिरीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करता येणार नाही. “

“मी अजूनही क्रिकेट खेळण्याचं कारण म्हणजे मी या खेळाचा अजूनही आनंद घेत आहे. मी यासाठी खेळत नाही की मला पुन्हा भारत किंवा आयपीएलमध्ये संधी खेळता यावे. परंतु हे खेळण्यामागची प्रेरणा म्हणजे भारताकडून खेळायला मिळेल अशीच आहे. मी अजूनही २ ते ३ आयपीएल आरामात खेळू शकतो. ” असेही तो पुढे म्हणाला.

युवराज सध्या पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याचा संघ साखळी फेरीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे.