मी काहीही चुकीचं केलं नाही : रविचंद्रन अश्विन

चेन्नई: भारताचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन कसोटीत आपल्या फिरकीची जादू दाखवत असला तरी वनडे संघात त्याला २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर स्थान देण्यात आलेले नाही. निवड समितीने सांगितले होते की त्याला विश्रांती देण्यात आलेली आहे पण जर तसे असेल तर अश्विन इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट का खेळत आहे हे एक मोठ रहस्य आहे.

युवा फिरकी गोलंदाज यज्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी२० सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि आता तर दबलेल्या आवाजात अशीपण चर्चा होऊ लागली आहे की आता कसोटीच्या या स्टार खेळाडूला वनडे आणि टी२० संघात पुनरागमन करणे अवघड आहे.

पण भारताच्या या फिरकी गोलंदाजाला आत्मविश्वास आहे की तो कसोटी बरोबर वनडे आणि टी२० मधेही चांगली कामगिरी करू शकतो. सध्या अश्विन तामिळनाडूसाठी रणजी खेळत आहे.

” वनडे क्रिकेटमध्ये किंवा टी२० क्रिकेटमध्ये मी काही चुकीचे केले आहे असे मला वाटत नाही. मला पुन्हा संधी मिळेल आणि मी त्याचे सोने करेल. आता मला माझ्या खेळावर आणखीन काम करण्याची गरज आहे.”

 

” मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा भारताचे सर्व सामने बघणे मला शक्य झाले नाही, पण मी काही षटके बघितली. कुलदीप यादव हा उत्तम गोलंदाज आहे आणि तो नक्कीच चांगली कामगिरी करत आहे.”

 

“काऊंटी क्रिकेट खेळल्यामुळे मला विकेट घेण्याच्या नवीन पद्धती समजल्या आहेत. भारतीय उपखंडाच्या बाहेर गोलंदाजी करताना खेळपट्टीमधून जास्त मदत मिळत नाही. त्यामुळे मला अधिक संयमाने गोलंदाजी करणे गरजेचे आहे.”