जगातील या सर्वोत्तम खेळाडूंकडून स्टिव स्मिथ घेतो फलंदाजीचे धडे

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ जरी इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत अपयशी ठरला असला तरी तो कसोटीमध्ये अफलातून फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने या वर्षी कसोटीत केलेल्या कामगिरीचे सर्वांकडून कौतुकही झाले आहे.

स्मिथ नेहमीच त्याच्या खास शैलीत फलंदाजी करत असतो. त्याची सर्वांसारखी शास्त्रयुक्त फलंदाजी नाही. याबद्दल स्मिथने सांगितले की तो जगातील अनेक सर्वोत्तम फलंदाजांचे निरीक्षण करून तशीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो.

याबद्दल cricket.com.au शी बोलताना स्मिथ म्हणाला, “मी जगातील सर्वोत्तम फलंदाजांची निरीक्षण करतो आणि कधीकधी मी त्यांच्या सारखी फलंदाजीही करण्याचा प्रयत्न करत असतो. मी प्रयत्न करून शिकतो. काहीतरी कारणामुळेच हे लोक सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करून तुम्हाला जे हवे ते मिळवू शकता.”

याबरोबरच स्मिथने असेही मत मांडले आहे की तो प्रत्येकवेळी यशस्वीच होईल असे नाही. कधीतरी तोही बाद होतो. तसेच तो असेही म्हणाला की तो जिथे खेळतो तेथील वातावरणाप्रमाणे त्याच्या फलंदाजी शैलीत बदल करतो. यासाठी त्याने भारत दौऱ्याचे उदाहरण देताना सांगितले की तो जेव्हा भारतात खेळतो तेव्हा तो खेळताना त्याचे हात थोड्याप्रमाणात खुले करून खेळतो.

त्याने पुढे असेही सांगितले की तो त्यानंतर ऑस्ट्रेलियात फलंदाजी कशी करायची हेच विसरला होता त्यामुळे त्याने त्यासाठी सराव केला होता.

स्मिथला यावर्षीचा आयसीसीचा सर्वोत्तम कसोटीपटूचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच तो यावर्षीचा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी दिल्या जाणाऱ्या ‘बॉर्डर मेडल’चा मानकरी ठरला आहे.