आयसीसी एकदिवसीय क्रमवारी घोषित, विराट अव्वल !

नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानी कायम आहे. विराट कोहलीच्या खात्यात सध्या ८७३ गुण असून दुसऱ्या क्रमांकावरील डेविड वॉर्नरच्या नावावर ८६१ गुण आहेत.

अन्य भारतीय खेळाडूंमध्ये फलंदाजी क्रमवारीत एमएस धोनी ७२८ गुणांसह १२व्या, शिखर धवन ७२५ गुणांसह १३व्या आणि रोहित शर्मा ७२४ गुणांसह १५व्या स्थानी आहेत. अजिंक्य रहाणे(२३), केदार जाधव(४४) आंबटी रायडू(६७), रवींद्र जडेजा (८६), हार्दिक पंड्या(८७) आणि युवराज सिंग (८९) अशा क्रमांकावर आहेत.
गोलंदाजी क्रमवारीत कोणताही भारतीय खेळाडू पहिल्या दहा खेळाडूंमध्ये नाही. भुवनेश्वर कुमार ६०८ गुणांसह १३व्या, अक्सर पटेल(२०), आर अश्विन(२१), अमित मिश्रा(२२), मोहम्मद शमी(३०), जसप्रीत बुमराह(३२), रवींद्र जडेजा(३३), उमेश यादव(३७), हार्दिक पंड्या(६३), धवल कुलकर्णी(९२) हे खेळाडू पहिल्या १०० गोलंदाजात आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रविन्द्र जडेजा हा एकमेव खेळाडू पहिल्या २० खेळाडूंत असून तो २४० गुणांसह १३व्या स्थानी आहे.
भारतीय संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच क्रमांकावर टिकून राहण्यासाठी लंकेविरुद्धची मालिका भारताला कमीतकमी ४-१ अशी जिंकावी लागणार आहे. जर भारत ही मालिका ३-२ अशी जिंकला तर दशांश गुणांच्या फरकाने भारताला इंग्लंड मागे टाकून तिसरा क्रमांक मिळवेल. जर लंकेने भारताविरुद्ध २ सामने जिंकले तरच श्रीलंका २०१९च्या विश्वचषकाला थेट पात्र ठरणार आहे.

२०१९च्या विश्वचषकाला पात्र ठरण्याची शेवटची तारीख ही ३० सप्टेंबर आहे. सध्या लंका ८८ गुणांसह ८व्या स्थानी असून त्यांचे १० गुण ९व्या स्थानावरील विंडीजपेक्षा जास्त आहे. यजमान इंग्लंड सोडून बाकी ७ देश हे या विश्वचषकासाठी ३० सप्टेंबर पर्यंत थेट पात्र ठरणार आहेत.