कसोटी क्रमवारीत विराट पाचव्या स्थानी तर जडेजाची क्रमवारीत घसरण !

आयसीसीने आज जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत पाचवे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर अष्टपैलू रवींद्र जडेजाची मात्र क्रमवारीत घसरण होऊन तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

काल पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराटने ११९ चेंडूंत १०४ धावांची शतकी खेळी केली होती. हे त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५० वे शतक होते. हा सामना अनिर्णित राहिला.

विराटबरोबरच फलंदाजी क्रमवारीत केएल राहुल ८ व्या स्थानी कायम आहे. तसेच शिखर धवनने २ स्थानांची प्रगती करून २८ व्या स्थानी आला आहे. तर गोलंदाजी क्रमवारीत भुवनेश्वर कुमारने ८ स्थानांची प्रगती करत कारकीर्तीतील सर्वोत्तम २९वे स्थान मिळवले आहे. तर मोहोम्मद शमीने एका स्थानाची प्रगती करत १८वे स्थान मिळवले आहे.

भुवनेश्वर हा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीर किताबाचा मानकरी ठरला होता. या सामन्यात त्याने ८ बळी मिळवले होते.

त्याचबरोबर जडेजाची गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर आर अश्विन चौथ्या स्थानी कायम आहे. याबरोबरच जडेजाने अष्टपैलू क्रमवारीत २० गुण गमावले आहेत. परंतु तो दुसऱ्या स्थानी कायम आहे. अश्विन मात्र या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरून चौथ्या स्थानी आला आहे.

संघ क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे.