Breaking: अखेर विराटने मास्टर ब्लास्टर सचिनचा तो विक्रम मोडलाच

सेंच्युरियन । भारतीय क्रिकेट संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जरी कसोटी मालिकेत २-० असे पराभवाला सामोरे जावे लागले असले तरीही भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे विक्रम काही थांबायचे नाव घेत नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार दिवसेंदिवस यशाची नवी शिखरे गाठत आहे. तसेच महान खेळाडूंचे विक्रम रोज तोडत आहे. असाच एक खास विक्रम जो कोणत्याही खेळाडूला आपल्या नावावर असावा असा वाटेल तो विराटने आपल्या नावे केला आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात स्वप्नवत १५३ धावांची खेळी करणाऱ्या विराटला या खेळीमुळे २० गुणांची कमाई झाली. यामुळे त्याचे एकूण गुण ८८० वरून ९०० झाले.

ज्यामुळे सार्वकालीन कसोटी क्रमवारीत (ICC Best-Ever Test Championship Rating) विराट ३०व्या स्थानी पोहचला. ह्याच यादीत त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कच्या ९०० गुणांच्या विक्रमाची बरोबरी करताना सचिनच्या ८९८ गुणांच्या विक्रमाला मागे टाकले.

२०१३ साली सचिनचे सार्वकालीन कसोटी गुणांकन हे ८९८ होते आणि क्रमांक होता ३१ वा. आता सचिनचे ३२व्या क्रमांकावर गेला आहे.

भारताकडून सार्वकालीन कसोटी क्रमवारीत (ICC Best-Ever Test Championship Rating) सुनील गावसकर हे अव्वल असून त्यांनी ३ सप्टेंबर १९७९मध्ये इंग्लंडविरुद्ध ९१६ ह्या सर्वोच्च गुणांची कमाई केली होती.

आता विराटला त्यांचा हा विक्रम मोडायची मोठी संधी आहे.

या यादीत जागतिक क्रिकेटपटूंमध्ये सर डॉन ब्रॅडमन अव्वल असून त्यांनी १० फेब्रुवारी १९४८मध्ये ९६१ गुणांची कमाई केली होती तर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा सध्याचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ असून त्याने ३० डिसेंबर २०१७मध्ये तब्बल ९४७ गुणांची कमाई केली होती.