पृथ्वी शॉच्या टीम इंडियासमोर उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचे आव्हान!

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील सुपर लीग उपांत्यपूर्व फेरीचे सामने घोषित झाले आहेत. या उपांत्य पूर्व फेरीत ८ संघ खेळणार आहेत.

उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार असून हा सामना २६ जानेवारीला खेळवला जाईल. भारत आणि बांग्लादेशाबरोबरच इंग्लंड, ऑस्ट्रलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

भारतीय संघाने या विश्वचषकात साखळी फेरीतील तीनही सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी या तीनही सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे निष्प्रभ केले आहे. भारतीय संघाचा कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी करताना पहिल्या दोनही सामन्यात अर्धशतके झळकावली.

पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पृथ्वीचे फक्त ६ धावांनी शतक हुकले होते. तो ९४ धावांवर बाद झाला होता. त्याच्या याच खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध १०० धावांनी विजय मिळवला होता.

दुसऱ्या सामन्यातही पापुआ न्यू गिनी संघाविरुद्ध पृथ्वीने नाबाद ५७ धावा केल्या होत्या. भारतीय संघांनी या सामन्यात १० विकेट्सने विजय मिळवून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली होती.

भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वे विरुद्ध सलामीची जोडी बदलली होती. तरीही भारतीय संघाने झिम्बाब्वेला १० विकेट्सने पराभूत केले.

या उत्तम कामगिरीमुळे भारतीय संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भारतीय संघाच्या प्रशिक्षण पदी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड असून २०१६ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातही भारतीय संघाने द्रविडच्या प्रशिक्षणाखाली अंतिम सामन्यात धडक मारली होती.

असे होणार आहेत १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ चे सुपर लीग उपांत्य पूर्व फेरीतील सामने:

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २३ जानेवारी
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २४ जानेवारी
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान – २५ जानेवारी
भारत विरुद्ध बांगलादेश – २६ जानेवारी