महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव

अँटिग्वा। आज (25 नोव्हेंबर) महिला टी20 विश्वचषकात आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात अंतिम सामना पार पडला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी इंग्लंड महिला संघाचा 8 विकेट्सने पराभव करत चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. आॅस्ट्रेलियाच्या या विजयात अॅशलेह गार्डनरचा अष्टपैलू खेळ महत्त्वाचा ठरला.

आत्तापर्यंत सहा महिला टी20 विश्वचषक झाले आहेत. या सहा विश्वचषकांपैकी 2010, 2012, 2014 आणि 2018 चा विश्वचषक आॅस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर 2009 ला इंग्लंड आणि 2016 ला विंडिजने या महिला टी20 विश्वचषकावर आपली मोहोर उमटवली होती.

आज पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलिया समोर 106 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान आॅस्ट्रेलियाने 15.1 षटकातच पूर्ण केले. या आव्हानाचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती.

पण चांगल्या सुरुवातीनंतरही एलिसा हेलीने 22 धावांवर असताना विकेट गमावली. त्यानंतर अॅशलेह गार्डनर आणि बेथ मुनीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण मुनीने 14 धावांवर खेळत असताना तिला इंग्लंडच्या डॅनिएल हेझलने बाद केले.

पण त्यानंतर मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांना आॅस्ट्रेलियाच्या गार्डनर आणि कर्णधार मेग लेनिंगची विकेट घेण्यात अपयश आले. या दोघींनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 62 धावांची भागीदारी रचत आॅस्ट्रेलियाला चौथा महिला टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.

गार्डनरने 26 चेंडून नाबाद 33 धावा केल्या. या खेळीत तिने 1 चौकार आणि 2 षटकार मारला. तर कर्णधार लेनिंगने तीन चौकारांसह 30 चेंडूत 28 धावा केल्या.

तत्पूर्वी इंग्लंड कडून डॅनिएल वॅट आणि कर्णधार हिदर नाइट यांनीच थोडीफार लढत दिली. पण या दोघींव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.

वॅटने 37 चेंंडूत 43 धावा केल्या. या खेळीत तिने 5 चौकार आणि 1 षटकार मारला. तर नाइटने 28 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 25 धावा केल्या.

आॅस्ट्रेलियाकडून गार्डनरने सर्वाधिक धावांत 3 विकेट घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी मेगन शट(2/13), जॉर्जिया वेरहॅम(2/11) आणि एलिस पेरी(1/23) यांनी विकेट घेत इंग्लंडचा डाव 19.4 षटकात 105 धावांवर संपूष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’

प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात असा मोठा पराक्रम करणारा सिद्धार्थ देसाई ठरला पहिला खेळाडू