या दोन गोलंदाजांना अजूनही मिळू शकते विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी

आज(15 एप्रिल) 2019 विश्वचषकासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या विश्वचषकाला 30 मेपासून सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

या 15 जणांच्या भारतीय संघात मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर हार्दिक पंड्या हा देखील वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय आहे.

पण त्याचबरोबर निवड समीतीने असाही निर्णय घेतला आहे की आणखी चार पर्यायी गोलंदाजही भारतीय संघाबरोबर इंग्लंडला जातील. यामुळे भारतीय संघाला नेटमध्ये सराव करताना मदत होईल, तसेच जर भारताच्या 15 जणांच्या संघातील एखाद्या महत्त्वाच्या वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली तर हे पर्यायी वेगवान गोलंदाजही असतील.

असे असले तरी अजून या चार गोलंदाजांची नावे घोषित झालेली नाही. परंतू त्यात खलील अहमद आणि नवदीप सैनी हे दोन गोलंदाज असतील याबाबत निवड समीतीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सुचित केले आहे.

प्रसाद म्हणाले, ‘खलील अहमदचे नावही चर्चेत आले होते. त्याच्याबरोबरच आम्ही नवदीप सैनीवरही चर्चा केली. त्यामुळे ते कदाचीत संघात येऊ शकतील आणि संघाच्या आजूबाजूलाच असतील. जर गरज पडलीच तर नक्कीच त्यांच्यातील एकाची निवड होऊ शकते.’

खलीलने 2018 च्या आशिया चषकात हाँगकाँग विरुद्ध पदार्पण केले होते. तो 8 वनडे सामने खेळला असून त्याने 11 विकेट्स घेतल्या आहेत.

तसेच नवदीप सैनीला मात्र अजून भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याला मागीलवर्षी अफगाणिस्तान विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतू त्याला अंतिम 11 जणांमध्ये संधी मिळाली नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या –

२०१९ विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंची अशी आहे कामगिरी

मोठी बातमी – २०१९ विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा