विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ६ कर्णधार

क्रिकेट विश्वचषक २०१९ ला ३० मे रोजी यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका सामन्याने सुरुवात होणार आहे. हा विश्वचषक ३० मे ते १४ जुलै या कालावधीत पार पडणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळणार आहे.

भारतीय संघाचा हा ११ वा विश्वचषक असून आजपर्यंत एकूण ६ खेळाडूंनी संघाचे नेतृत्व विश्वचषकात केले आहे. विशेष म्हणजे या ६ पुर्णवेळ कर्णधारांनीच विश्वचषकात नेतृत्व केले आहे. संघातील अन्य कोणत्याही खेळाडूला एखाद्या दुसऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. सर्वाधिक सामने नेतृत्त्व करण्याची संधी मोहम्मद अझरुद्दीनला मिळाली. सर्वाधिक तीन विश्वचषकात संघाचं नेतृत्त्व करताना त्याने तब्बल २३ सामन्यात सामने खेळले आहे.

श्रीनिवास वेंकटराघवन- (१९७५ आणि १९७९)

श्रीनिवास वेंकटराघवन म्हटलं की आपल्याला चटकन एका आंतरराष्ट्रीय पंचाची आठवण येते. परंतु या पंचाने भारतीय संघाचं दोन विश्वचषकात नेतृत्त्व केले आहे हे फारच कमी लोकांना माहित आहे. जागतिक क्रिकेटमधील पहिल्याच विश्वचषकात या खेळाडूने संघाचे नेतृत्त्व केले होते. गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या वेंकटराघवन यांनी कारकिर्दीत ११ सामने खेळले. यातील ६ सामने ते या दोन विश्वचषकात खेळले. यात त्यांना ६ सामन्यात एकही विकेट घेता आली नाही तर बॅटने त्यांनी ४३ धावा केल्या. १९९३ साली त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणुन पदार्पण केले.

कपिल देव – (१९८३ आणि १९८७)

Image- ICC Twitter

भारतीय संघाने १९८३ साली पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले ते माजी कर्णधार कपिल देवच्या नेतृत्त्वाखाली. १९८३ विश्वचषकातील त्याची झिंबाब्वेविरुद्धची १८५ धावांची खेळी आजही चाहते विसरले नाहीत. कपिलने दोन्ही विश्वचषक मिळून कर्णधार म्हणून १५ सामने खेळले. यात त्याने ५६.८७च्या सरासरीने ४५५ धावा केल्या तसेच २९.६४च्या सरासरीने १७ विकेट्सही घेतल्या.

मोहम्मद अझरुद्दीन- (१९९२, १९९६ आणि १९९९) 

१९९६ चा विश्वचषक सोडला तर अझरुद्दीनसाठी १९९२ आणि १९९६चे विश्वचषक खराबच राहिले. परंतु कर्णधार म्हणुन सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो रिकी पाॅटींग (२९), स्टीफन फ्लेमिंग (२७) पाठोपाठ २३ सामन्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. तसेच या २३ सामन्यात त्याने ३५.३३च्या सरासरीने ६३६ धावा केल्या आहेत. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो तिसरा आहे. भारतीय संघातील अनेक दिग्गज अझरच्या नेतृत्त्वाखाली विश्वचषकात खेळले आहेत.

सौरव गांगुली- (२००३)

Image- ICC

भारतीयांनी जर सर्वाधिक चर्चा कोणत्या विश्वचषकाची केली असेल तर तो २००३चा विश्वचषक. भारतीय संघ मॅच फिक्सींग प्रकरणातून नुकताच सावरत असताना सौरव गांगुलीच्या रुपाने भारताला युवा प्रतिभावान कर्णधार मिळाला होता. कर्णधार असताना आपल्या पहिल्याच विश्वचषकात गांगुलीने संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते. गांगुलीला कर्णधार असताना एकूण ११ सामने खेळायला मिळाले. यात त्याने ४६५ धावा तर केल्याच तसेच ३ विकेट्सही घेतल्या.

राहुल द्रविड- (२००७)

भारतीय जो विश्वचषक स्वप्नातही आठवत नसतील तो विश्वचषक म्हणजे क्रिकेट विश्वचषक २००७. कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली या विश्वचषकात भारतीय संघाने खूपच खराब कामगिरी केली होती. द्रविडनेही ३ सामन्यात जेमतेम ८१ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला बांगलादेश आणि श्रीलंका संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. संघ साखळी फेरीतूनच बाहेर फेकला गेला होता.

एमएस धोनी- (२०११ आणि २०१५)

Photo Courtesy: Twitter/ICC

२००७चा टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीने भारतीय संघाला भारतात झालेल्या २०११च्या क्रिकेट विश्वचषकातही विजय मिळवुन दिला होता. तसेच २०१५ विश्वचषकात भारतीय संघाने उपांत्यफेरीत मजल मारली होती. धोनी हा भारताचा विश्वचषकातील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. दोन विश्वचषकात धोनीने १७ सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना ५३.११च्या सरासरीने ४७८ धावा केल्या. विशेष म्हणजे २००७ नंतर धोनी क्रिकेट विश्वचषकात पहिल्यांदाच एक खेळाडू म्हणुन खेळणार आहे.

विश्वचषकात एकदा कर्णधार झाल्यानंतर त्यानंतरच्या विश्चचषकात खेळाडू म्हणुन खेळणारा धोनी हा सौरव गांगुलीनंतरचा दुसराच भारतीय खेळाडू आहे.

विराट कोहली- (२०१९)

Photo Courtesy: Twitter/BCCI

वनडे क्रिकेटमधील गेल्या ७ वर्षातील सर्वात जबरदस्त कामगिरी करणारा आणि २०१९ चा विश्वचषकात ज्या खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे तो खेळाडू अर्थात विराट कोहली भारतीय संघाचे या विश्वचषकात नेतृत्त्व करत आहे. विराटने २०११ आणि २०१५ विश्वचषकात आतापर्यंत भाग घेतला आहे. खेळाडू म्हणुन तो विश्वचषक जिंकला देखील आहे. दोन विश्वचषकात १७ सामन्यात त्याने४१.९२च्या सरासरीने ५८७ धावा केल्या आहेत. या विश्वचषकात विराटकडून भारतीयांना कर्णधार म्हणुन मोठ्या अपेक्षा आहेत.